२५ हजार ग्राहकांची वीज तोडली

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,ठाणे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
२५ हजार ग्राहकांची वीज तोडली
वीजबिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या महावितरणच्या ठाणे नागरी मंडळातील वीजग्राहकांची संख्या २५ हजारांहून अधिक आहे. या ग्राहकांकडे मूळ थकबाकीची रक्कम सुमारे २६ कोटी १३ लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

अभय योजनेच्या माध्यमातून थकबाकी वसूल करण्याचा महावितरणकडून प्रयत्न होत आहे. तरी महावितरणच्या ठाणे नागरी मंडळातील वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांची संख्या २५ हजार ८४६ (३१ मार्च, २०२६ पूर्वीची) आहे. या ग्राहकांकडे मूळ थकबाकीची रक्कम २६ कोटी १३ लाख ७३ हजार ५१४ रुपये आहे. विलंब आकाराची थकबाकी ३२ लाख ६७ हजार १६९ रुपये, तर व्याज थकबाकीची रक्कम ३ कोटी १७ लाख १० रुपये आहे.
भांडुप विभागात सर्वाधिक

ठाणे नागरी मंडळात पाच विभाग असून, यापैकी भांडुप विभागात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांकडे असलेली मूळ थकबाकी सर्वाधिक, म्हणजेच ९ कोटी ४२ लाख रुपये आहे. वागळे इस्टेट विभागातील वीजपुरवठा खंडित केलेल्या आठ हजारांहून अधिक ग्राहकांकडे सात कोटी रुपयांपेक्षा जास्त मूळ थकबाकी आहे. कल्याण परिमंडळातील कल्याण मंडळ कार्यालय १ अंतर्गत ४३ हजार २८५, कल्याण मंडळ कार्यालय २ अंतर्गत ९७ हजार १४४, पालघर मंडळ कार्यालयांतर्गत ६३ हजार ३४८, वसई कार्यालयांतर्गत १ लाख ९ हजार ९५९ ग्राहकांकडे ३१२ कोटींची थकबाकी आहे.

अभय योजनेतून सवलती

अभय योजनेअंतर्गत एकूण थकबाकीमधील व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. उर्वरित मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यात आणखी २० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.