यंदा पावसाळ्यात झालेला कमी पाऊस, एल निनोचा प्रभाव आणि ऑक्टोबरपासून मान्सूनने लवकर माघार घेतल्यामुळे १० टक्के पाणीकपात करण्याचे ठरले आहे. त्यामुळे ठाणे शहरातील गृहसंकुलांमध्ये मोठ्या प्रमाणात टँकरची मागणी वाढली असताना, टँकर लॉबीकडून सर्वसामान्य ठाणेकरांची मोठी लूट सुरू आहे. ठाणे महापालिकेकडून १० हजार लिटर पाणी सुमारे ७०० रुपयांना उपलब्ध होत असताना, नागरिकांकडून त्याच पाण्यासाठी टँकरचालकांकडून तब्बल ३५०० रुपये उकळले जात आहेत. काही ठिकाणी टँकरसाठी आठ हजार रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत.
पाणीकपातीमुळे घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील अनेक सोसायट्यांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, टँकर वेळेवर मिळत नसल्याने आणि क्षमतेनुसार दरांमध्ये मोठी तफावत असल्याने नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. खासगी टँकरची अधिकृत नोंदणी करून त्यांच्या क्षमतेनुसार दर निश्चित करावेत. हे दर महापालिकेच्या संकेतस्थळावर आणि प्रभाग कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करावेत. मुंबईसह अन्य भागांतून ठाण्यात येणाऱ्या टँकरचीही नोंद ठेवून पाण्याचा स्रोत तपासावा. नागरिकांना टँकर मागविण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. नोंदणीकृत टँकरांना जीपीएस यंत्रणा बसवून त्यांचे लोकेशन आणि पाणी वितरणावर नियंत्रण ठेवावे. निर्धारित दरापेक्षा अधिक पैसे आकारणाऱ्या चालकांविरोधात तक्रार करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी त्यांनी केली.सुधारणा अंतिम टप्प्यात
टँकरना जीपीएस यंत्रणा बसविणे आणि दरपत्रक निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत याआधीच आदेश दिले आहेत. लवकरच ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येईल, असे पाणीपुरवठा विभागाने सांगितले.