पुणेकरांचे आणि शहरात पर्यटनासाठी येणाऱ्यांचे हक्काचे पर्यटनस्थळ असलेल्या ऐतिहासिक किल्ले सिंहगडावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. पर्यटकांची सुरक्षितता, वाहनांची वर्दळ, गर्दीचे नियोजन आणि ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण लक्षात घेऊन, गडावर सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचे काम सुरू झाले आहे. पुणे वन विभाग आणि संयुक्त वनव्यवस्थापन समिती, घेरा सिंहगड यांच्या पुढाकारातून ही व्यवस्था करण्यात येणार असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही यंत्रणा कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात सिंहगड वाहन तपासणी नाका, घाट रस्त्यावरील चेकपोस्ट क्रमांक २, वाहनतळ, पुणे दरवाजा, पायरी मार्ग, तानाजी मालुसरे स्मारक आणि राजाराम महाराज समाधीस्थळ अशा महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे.ऋतू कोणताही असो, सिंहगडावर शनिवार- रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होते. गेल्या काही वर्षांत दुर्गप्रेमींबरोबरच सहकुटुंब गडभेट देणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे कित्येकदा घाट रस्त्यावर वाहतूक कोंडीही बघायला मिळते. गडावर आलेले बहुतांश पर्यटक नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे स्मारक, छत्रपती राजाराम महाराज समाधीस्थळ, कल्याण दरवाजा यांसह ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात रेंगाळतात.
गडावरील ही वाढती गर्दी, वाहनांची अनियंत्रित ये-जा आणि काही पर्यटकांकडून होणारे गैरवर्तन यामुळे गडावरील सुरक्षितता आणि शिस्त राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपद्रव शुल्कातून जमा झालेल्या निधीचा वापर करून सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
या यंत्रणेमुळे गडावर येणाऱ्या वाहनांची संख्या, त्यांचे नोंदणी क्रमांक आणि पर्यटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. उपद्रव शुल्क भरून प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या पडताळणीबरोबरच गर्दीच्या काळात वाहतूक नियंत्रणासाठीही या दृश्य नोंदींचा उपयोग होईल. याशिवाय, गडावरील ऐतिहासिक वास्तू, तटबंदी आणि नैसर्गिक परिसराची नासधूस करणाऱ्यांविरुद्ध ठोस कारवाई करणे यामुळे सुलभ होईल.