‘महादेव ॲप’च्या सूत्रधाराला अटक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
mahadev app founder saurabh chandrakar arrested
रायपूर/नवी दिल्ली : महादेव बेटिंग ॲप फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी आणि या ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी अटक केली. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विशेष न्यायालयाने चंद्राकरला १९ नोव्हेंबरपर्यंत ‘ईडी’ची कोठडी दिली.

ईडीकडून तपास सुरू असलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणात न्यायालयाने चंद्राकरच्या भारताकडे प्रत्यार्पणास परवानगी दिल्यानंतर एक नोव्हेंबर रोजी त्याला ओमानमधून दिल्लीला आणण्यात आले होते. रायपूरमधील विशेष सीबीआय न्यायालयाने १२ नोव्हेंबर रोजी चंद्राकरला १९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. त्यानंतर त्याचा ताबा शुक्रवारी ‘ईडी’ने घेतला.
महादेव ऑनलाइन बुक (एमओबी) म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या महादेव ॲपचे काम २०१९-२० मध्ये सुरू झाले, असे यंत्रणेने सांगितले.