कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या आउटलुकसह विविध सेवांमध्ये गुरुवारी रात्रीपासून मोठा तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे जगभरातील लाखो वापरकर्ते, कंपन्या आणि सरकारी कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम झाला. आउटलुक, टीम्स आणि कोपायलटसह ‘ मायक्रोसॉफ्ट ३६५ ’मधील अनेक सेवा बंद पडल्याने जगभरात डिजिटल खोळंबा झाला. शुक्रवारीही अनेक सेवांमधील अडथळे कायम असल्याने त्या पूर्ववत करताना कंपनीच्या अभियंत्यांची तारांबळ उडाली.
अमेरिकेतील रेडमंड येथे मुख्यालय असलेल्या मायक्रोसॉफ्टने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, एक्स्चेंज ऑनलाइन आणि ई-मेल सेवांशी संबंधित यंत्रणांमध्ये बिघाड झाल्याने हा व्यत्यय निर्माण झाला. जगभरातील ४३ कोटींहून अधिक लोक ‘मायक्रोसॉफ्ट ३६५’मधील विविध ॲप वापरतात.‘आउटेज ट्रॅकर डाउनडिटेक्टर’वर गुरुवारी सुमारे एक लाख ३० हजार वापरकर्त्यांनी आउटलुक सेवा बंद असल्याच्या तक्रारी नोंदवल्या होत्या. ७४ देश आणि प्रदेशांमधून या तक्रारी आल्या होत्या. सुरुवातीला सेवा पूर्ववत झाल्याचे कंपनीने सांगितले; मात्र काही सेवांमधील अडचणी कायम होत्या. त्यामुळे दुरुस्तीचे प्रयत्न सुरू ठेवावे लागले. त्यानंतर सेवांमध्ये सुधारणा होत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
हा बिघाड सायबरहल्ल्यामुळे किंवा जाणीवपूर्वक केलेल्या कारवाईमुळे झाल्याचे कोणतेही संकेत नसल्याचे ‘मायक्रोसॉफ्ट’चे अधिकारी चार्ल्स लमन्ना यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये स्पष्ट केले.