पुणे : ‘श्री घैसास गुरुजी वेदपाठशाळेचे संस्थापक ‘वेदमहर्षी विनायकभट्ट घैसास गुरुजी स्मृती पुरस्कार’ निवारा वृद्धाश्रम संस्थेला देण्यात येणार आहे. सव्वा लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. उद्या, शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता वेदभवन येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे,’ अशी माहिती वेदभवनचे प्रधानाचार्य मोरेश्वर विनायक घैसास गुरुजी यांनी गुरुवारी दिली. वेदभवनतर्फे १९९८ पासून हा पुरस्कार देण्यात येतो.
संदीप मनोहर यांच्या चित्रांचे प्रदर्शनपुणे : छायाचित्रकार संदीप मनोहर यांच्या ‘स्मृतींचे तुकडे’ हे पहिले चित्रप्रदर्शन २३ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. सकाळी साडेनऊ ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन रसिकांसाठी विनामूल्य खुले राहील. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता लीला पूनावाला फाउंडेशनच्या अध्यक्ष लीला पूनावाला यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद् घाटन होणार आहे. आधुनिकता, प्रतीकात्मकता आणि भावनिक आशय यांचा संगम असलेली चित्रशैली हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.
लोककलावंतांसाठी ‘अर्बन तमाशा’
पुणे : ‘दुष्काळग्रस्त लोककलावंतांना आर्थिक मदत आणि ग्रामीण कलाकारांना शहरी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक प्रकोष्ठातर्फे ‘अर्बन तमाशा’ हा कार्यक्रम २२ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे,’ अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रमेश परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ग्रामीण भागातील कलाकार गायन, संगीत आणि पारंपरिक लोककलेचे सादरीकरण करणार आहेत. लोककलेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच दुष्काळग्रस्त कलाकारांना आर्थिक आधार देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.