गाय आणि म्हशीच्या पिशवीबंद दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर चार रुपयांनी वाढ होणार आहे. ही दरवाढ सोमवारपासून (१६ नोव्हेंबर) लागू होणार असून, दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही सरासरी १० टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे.
राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांच्या प्रतिनिधींची संघटना असलेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची बैठक शुक्रवारी कात्रज येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यालयात झाली. या बैठकीत दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्यातील सर्व दूध संघाच्या पिशवीबंद दूधाची दरवाढ होणार आहे. संघाचे अध्यक्ष गोपाळ म्हस्के, मानद सचिव प्रकाश कुतवळ, पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष अरुण चांभारे यांच्यासह राज्यातील प्रमुख सहकारी आणि खासगी दूध संघांचे ५० प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.डिझेल, वाहतूक, साखर, पॅकिंग आणि मनुष्यबळाचा खर्च तसेच दूध खरेदी दरात वाढ झाल्याने विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वाढीमुळे उत्पादन आणि प्रक्रिया खर्चाचा समतोल साधण्यासह दूध उत्पादकांना योग्य मोबदला देणे शक्य होणार असल्याचे संघाने सांगितले.
बाहेरील दूध ब्रँडच्या स्पर्धेचे आव्हान
परराज्यातील मोठ्या दूध ब्रँडची राज्यातील बाजारपेठेत वाढणारी विक्री आणि स्थानिक दूध ब्रँडची विक्री वाढविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. बाहेरील ब्रँडच्या वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी आणि स्थानिक ब्रँडची बाजारपेठ टिकवण्यासाठी आगामी काळात विविध उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहे.
राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही दूध संकलनात वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्यात दररोज सुमारे एक कोटी ६० लाख लिटर दूध संकलित होत होते. आता हे संकलन वाढून दररोज एक कोटी ६१ लाख ८३ हजार लिटर झाले आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही दूध संकलन वाढत असल्याचा दावा संघानी केला. शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी चारा आणि पाण्याची व्यवस्था करून दूध व्यवसाय करीत आहेत. गेल्या काही वर्षांतील आकडेवारीनुसार दुष्काळाच्या काळातही दूध संकलनात वाढ होत असल्याचे दिसून येते, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.