छत्रपती संभाजीनगर : भरधाव पिकअपच्या धडकेत मृत्यू झालेल्या सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान हनुमान यशवंतराव लिपणे यांच्या कुटुंबीयांना ८८ लाख ७० हजार १०० रुपये नुकसानभरपाई सात टक्के व्याजासह देण्याचा आदेश मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे सदस्य महेश तिवारी यांनी दिला आहे.
हनुमान लिपणे तीन मार्च २०२३ रोजी रात्री मोटारसायकलने जात असताना एमएच ०६ एजी ७५६९ क्रमांकाच्या भरधाव पिकअपने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पिकअप चालक शेख दौलत महंमद शेख याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. लिपणे यांच्या पत्नी अर्चना, मुले सुशांत व साक्षी आणि आई सुभद्राबाई यांनी ॲड. व्ही. सी. सरोदे व ॲड. ए. जी. काझी यांच्यामार्फत दोन कोटी रुपयांचा भरपाई दावा दाखल केला होता. न्यायाधिकरणाने चालकाचा निष्काळजीपणा सिद्ध झाल्याचे मानून चालक, वाहनमालक रणजित गताडे आणि विमा कंपनी यांना संयुक्तपणे व स्वतंत्रपणे भरपाई देण्याचे आदेश दिले. दावा दाखल केल्याच्या तारखेपासून रक्कम मिळेपर्यंत सात टक्के व्याज लागू राहील. ॲड. आर. बी. ढाकणे यांनी चालक व मालकांची, तर ॲड. के. ए. बनकर यांनी विमा कंपनीची बाजू मांडली.