विकासासाठी मंत्र्यांना साकडे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर व बजाजनगर परिसराचा विकास करण्यासाठी बांधकाम सभापती सचिन गरड यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे विशेष निधीची मागणी केली आहे. या वेळी प्रस्तावित विकासकामांसाठी चार कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली असून, यामध्ये रस्ते, पथदिवे, विविध चौकांचे सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, सभामंडप आदी कामे केली जाणार आहे.

वडगाव कोल्हाटी गट नंबर व बजाजनगर परिसरात नागरी वसाहती व वाढते औद्योगीकरण लक्षात घेता परिसरात अनेक मूलभूत सुविधा देण्यासाठी विशेष निधी मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. येथील गट नंबर परिसराचा अनेक दिवसांपासून विकास रखडला असून, तेथील उद्योजक व नागरी वसाहतींमधील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळण्यासाठी निधीची गरज आहे. वाळूज एमआयडीसीमध्ये जागा शिल्लक नसल्याने अनेक उद्योजकांनी गट नंबर परिसरात उद्योग थाटले आहेत; मात्र त्यांना रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत गरजा मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या उत्पादनांवर परिणाम होतो. मागणीला मंत्री गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे गरड यांनी सांगितले.