‘पीेएम स्वनिधी’त पालिका देशात तृतीय

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•

दिल्ली येथे स्वीकारला आयुक्तांनी पुरस्कार

‘पीेएम स्वनिधी’त पालिका देशात तृतीय
महापालिकेने प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून राष्ट्रीय पातळीवर तिसरा क्रमांक पटकावला.

दिल्ली येथे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहारमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते महापालिका आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अपर्णा थेटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. एनयूएलएम विभागाचे भारत मोरे, सुरेंद्र पाटील यांची या वेळी उपस्थिती होती.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या पीएम स्वनिधी योजनेचा उद्देश करोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पथविक्रेत्यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देऊन त्यांचे व्यवसाय पुन्हा उभे करणे आर्थिक सक्षमीकरण करणे हा आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मार्च २०२६ पर्यंत ३२ हजार ५८२ पथविक्रेत्यांना प्रथम कर्जाचा लाभ देऊन या योजनेच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महापालिकेने प्रथम कर्ज वितरणाच्या उद्दिष्टात १०० टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे. या यशात आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त अपर्णा थेटे, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनएलयूएम) अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने व सातत्यपूर्ण प्रयत्नांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.