पुणे येथील नियोजित शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मराठवाडा साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, ज्येष्ठ कवी श्रीकांत देशमुख आणि लेखक चंद्रकांत भोंजाळ यांच्या नावांचा प्रस्ताव अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला पाठवला आहे. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचा स्वतंत्र गट आणि बृहन्महाराष्ट्रातील संस्थांनीही भांड यांचे नाव सुचवले.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीसाठी २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी पुणे येथे बैठक होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत चार घटक संस्था आणि बृहन्महाराष्ट्रातील सहा संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित असतील. चार घटक संस्थांनी प्रत्येकी तीन नावांचा प्रस्ताव महामंडळाकडे दिला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेने बाबा भांड, श्रीकांत देशमुख आणि चंद्रकांत भोंजाळ यांच्या नावाची शिफारस केली आहे. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत वाद सुरू झाल्यानंतर परिषदेतील २१ सदस्यांच्या स्वतंत्र गटाने भांड यांच्या नावाचा आग्रह धरला आहे; तसेच बृहन्महाराष्ट्रातील काही संस्थांच्या सदस्यांनीही भांड यांच्या नावाला अग्रक्रम दिला आहे. महामंडळाचे काही पदाधिकारी शरणकुमार लिंबाळे, प्रवीण दवणे आणि रमेश पतंगे यांच्या नावासाठी आग्रही आहेत. त्यामुळे निवड बैठकीत बहुमत कुणाच्या बाजूने वळणार यावरून खल सुरू आहे. लिंबाळे आणि भांड यांच्या नावांची सर्वाधिक चर्चा आहे. मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे एकमत झाल्यास वेगळे नाव संमेलनाध्यक्षपदी दिसू शकते, असे पदाधिकारी म्हणाले.दरम्यान, शंभरावे साहित्य संमेलन असल्यामुळे चर्चा रंगली आहे. महामंडळाचे २१ सदस्य अध्यक्षांची निवड करणार असले, तरी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या सोयीचे नाव निवडण्यावर भर दिला जाईल, अशी चर्चा साहित्य वर्तुळात आहे. मागील दोन साहित्य संमेलनांपासून बाबा भांड यांचे नाव चर्चेत आहे.