कार्तिकी यात्रेचा पंढरपुरात उत्साह

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
कार्तिकी यात्रेचा पंढरपुरात उत्साह
वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरजवळील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर कार्तिकी एकादशीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता महाअभिषेक व महापूजा होणार आहे. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटे पाच वाजता विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते सपत्नीक महाभिषेक व महापूजा करण्यात येणार आहे.

येथील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर वर्षी कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते. यासाठी मोठ्या संख्येने भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. या वर्षी कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे महाभिषेक व आरतीनंतर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या दिंड्या, वारकरी यांच्या स्वागतासाठी छोटे पंढरपूर सज्ज झाले असून, भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.
येथील मंदिर परिसरात ४६व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे; तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता रविवारी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत श्री क्षेत्र सावखेडा येथील कैलासगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त मंदिर परिसरात वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर प्रशासन सज्ज असल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली आहे.