छत्रपती संभाजीनगर रस्त्याने घेतला मोकळा श्वास

Contributed by: खुलताबाद,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
छत्रपती संभाजीनगर रस्त्याने घेतला मोकळा श्वास
खुलताबाद तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत अतिक्रमणाविरुद्ध प्रशासनाने धडक कारवाई हाती घेऊन खुलताबाद ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील दुतर्फा अतिक्रमणे हटवली असून, काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली. प्रशासनाने जेसीबी लावून अतिक्रमणे काढली. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कनिष्ठ अभियंता पुष्पा खरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चार अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. या वेळी जेसीबीसह ट्रॅक्टर, विविध वाहने, यंत्रसामुग्री व मजूर पथक तैनात करण्यात आले होते.

सकाळी साडेदहा वाजेपासून शंजरी हॉटेल परिसरातून मोहिमेला सुरुवात झाली. रस्त्याच्या कडेला असलेल्या टपऱ्या, शेड, दुकाने जेसीबीने जमीनदोस्त करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा झालेली अनधिकृत बांधकामे, टपऱ्या, हॉटेल, जाहिरात फलक, पार्किंग यांमुळे रस्त्याच्या वाहतुकीवर परिणाम होऊन अपघाताचा धोका संभवत होता.
खुलताबाद ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर जवळपास १९९ अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ही मोहीम हाती घेण्यात आली. या ठिकाणी हॉटेल व्यवसायिक, ढाबाचालक, हिमरू साडी सेंटर यांनी रस्त्यावर अनधिकृत शेड फलक लावून रस्ता व्यापला आहे. पंधरा दिवसांपूर्वी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्याची नोटीस बजावल्यानंतरही अतिक्रमणधारकांनी ती काढली नव्हती. या महामार्गावर वाहनांची वर्दळ असते. अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका संभवतो.