शाहजहानपूर : वधूच्या कुटुंबीयांच्या घरावरील नावफलकावर ‘वंदे मातरम्’ असा उल्लेख असल्यामुळे ‘निकाह’ लावण्यास नकार दिल्याच्या आरोपावरून येथील एका मौलवीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोझा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बरमौला अर्जुनपूर गावातील रहिवासी असलेले वकील मोनिश यांच्या बहिणीचा निकाह १५ नोव्हेंबर रोजी ठरला होता. त्यांनी घराच्या नावफलकावर ‘वंदे मातरम्’, ‘जय हिंद’ अशा घोषणा लिहिल्या होत्या. स्थानिक मौलवी सुरखानने निकाह लावण्यासाठी बोलावण्यात आले. मात्र त्यांनी नकार दिला.महानिरीक्षकपदी भूपेंद्रसिंग यांची नियुक्ती
श्रीनगर : बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी भूपेंद्रसिंह यांनी शुक्रवारी काश्मीर फ्रंटियरचे नवे महानिरीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला. काश्मीर खोऱ्यातील सीमा सुरक्षाव्यवस्था, घुसखोरीविरोधी मोहिमा आणि इतर सुरक्षा यंत्रणांशी समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असेल. भूपेंद्रसिंह यांनी एडीजी, आयपीएस अशोक यादव यांच्याकडून कार्यभार स्वीकारला.
तेलंगणात माजी आमदारावर छापे
नवी दिल्ली : सरकारी धानसाठ्याच्या ४०.९६ कोटी रुपये किमतीच्या गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी तेलंगणातील दोन ठिकाणी झडती घेतली. यात माजी आमदार अजमेरा रेखा यांच्या निवासस्थानाचाही समावेश आहे. तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील रेखा आणि एआरएस इंडस्ट्रीजच्या ठिकाणांवर पहाटेपासून ही झडती मोहीम सुरू आहे.
अभिषेक बॅनर्जींच्या विरोधात घोषणाबाजी
कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) खासदार अभिषेक बॅनर्जी शुक्रवारी कोलकात्यातील गिरीश पार्क पोलिस ठाण्यात पोहोचताच भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांनी ‘चोर-चोर’च्या घोषणा दिल्या. बॅनर्जी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘टीएमसी’ समर्थकही पोलिस ठाण्याबाहेर जमले. त्यांनी घोषणा देताच भाजप कार्यकर्त्यांनी ‘चोर-चोर’च्या घोषणा दिल्या.
बलुचिस्तानमध्ये अपघातात १० जण ठार
क्वेट्टा : बलुचिस्तानमधील मकरान कोस्टल हायवेवर तुर्बतहून कराचीला जाणाऱ्या प्रवासी बसची पेट्रोलियम पदार्थाची वाहतूक करणाऱ्या टँकरशी धडक होऊन झालेल्या अपघातात किमान १० जण ठार, तर २७ जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी पसनी आणि ओरमारा दरम्यानच्या मार्गावर बासोलजवळ झाला. धडकेनंतर लागलेल्या आगीने दोन्ही वाहने भस्मसात झाली.
मशीद वादाप्रकरणी
२३ रोजी सुनावणी
नवी दिल्ली : सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत कृषी भवन परिसरातील शंभर वर्षांहून अधिक जुन्या मशिदीचे पाडकाम रोखण्याच्या याचिकेवर २३ नोव्हेंबर रोजी सुनावणी होईल. संबंधित दोन याचिकांवर एकत्रित सुनावणी होईल, असे दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले.
योगी आदित्यनाथ
यांच्या आईचे निधन
पौरी गढवाल/लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे शुक्रवारी सकाळी उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या.