राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा गेल्या आठवडाभरापासून राजकीय वर्तुळात सुरू असतानाच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यामुळे या चर्चांना पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे. विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर आणि विशेषतः पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून मतभेद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विलीनीकरणाचा निर्णय होण्यापूर्वी अध्यक्षपदाचा तिढा सोडविण्याचे मोठे आव्हान दोन्ही असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्यास पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व कोणाकडे राहणार, हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असल्याचे सांगितले जात आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपद गेल्यास पक्षावरील आपले राजकीय नियंत्रण कमी होण्याची भीती सुनेत्रा पवार यांच्या गटाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विलीनीकरणानंतर पक्षाची सूत्रे कोणाकडे असणार, यावरून दोन्ही बाजूंमध्ये एकमत होणे आवश्यक आहे. अध्यक्षपदाचा प्रश्न सुटल्याशिवाय विलीनीकरणाची प्रक्रिया पुढे जाणे अवघड असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.सुनेत्रा पवार पक्षाच्या अध्यक्ष असल्याने विविध कामांसाठी आमदारांनी त्यांची भेट घेणे स्वाभाविक आहे, असे पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी घेतला आहे.
विलीनीकरणाच्या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. या संदर्भात कोणतीही चर्चा सुरू नाही. ना औपचारिक, ना अनौपचारिक; ना आमच्या बाजूने, ना त्यांच्या बाजूने, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनीही विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे म्हटले आहे.