वाघाने बाळाला घरातून उचलले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
tiger snatches six month old baby from home
भंडारा : घरात पाळण्यात झोपलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकल्याला वाघाने घरात शिरून उचलल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास अड्याळ वन परिसरातील तिर्री येथे घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचा काही वेळातच मृत्यू झाला. अद्विक अभिमन बोंदरे असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. भीती आणि संतापाचे वातावरण आहे.

तिर्री येथील अभिमन बोंदरे यांना दोन मुली आहेत. अद्विक हा एकुलता एक मुलगा होता. शुक्रवारी सायंकाळी आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करीत होती. अद्विक पाळण्यात झोपला होता. याच वेळी अचानक वाघाने घरात प्रवेश करून अद्विकला उचलले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. आईने आरडाओरड केल्यानंतर वाघ बाळाला सोडून पळून गेला. मात्र, तोपर्यंत चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.