यशवंतराव चव्हाण गृहमंत्री

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
यशवंतराव चव्हाण गृहमंत्री
(टाइम्स वृत्तसंस्था)

नवी दिल्ली, दि. १३ - केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाचे असे बरेच फेरबदल आज रात्री येथे जाहीर करण्यात आले असून, श्री. यशवंतराव चव्हाण यांच्याकडे गृह खाते, श्री. एम्. सी. छगला यांच्याकडे परराष्ट्र व श्री. स्वर्णसिंग यांच्याकडे संरक्षण खाते देण्यात आले आहे.
पाटबंधारे व वीज खात्याचे मंत्री श्री. फकरुद्दीन अली अहमद यांच्याकडे शिक्षणखाते देण्यात आले आहे. त्यांच्या जागी डॉ. के. एल. राव पाटबंधारे व वीज खात्याचे मंत्री झाले आहेत. गृहखात्याचे राज्यमंत्री श्री. जयसुखलाल हाथी यांना संरक्षण खात्याचे राज्यमंत्री करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री श्री. गुलझारीलाल नंदा यांनी गेल्या सोमवारी राजीनामा दिल्यामुळे हे खातेबदल घडून आले. गेला आठवडाभर पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबत प्रतिदिनी काँग्रेस पक्षीय नेत्यांशी व मंत्रिमंडळातील आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांशी विचारविनिमय करीत होत्या. नवे बदल हा केवळ खातेबदल असल्यामुळे शपथविधी समारंभ होणार नाही.

श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या या नेमणुकीबाबत लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे. श्री. नेहरूंनी चार वर्षापूर्वी त्यांना संरक्षण खाते देऊ केले ते ८ नोव्हेंबर रोजी; व इंदिराजींनीही त्यांना ८ नोव्हेंबरलाच गृह खाते स्वीकारण्याची विनंती केली.

राज्याराज्यांतील सीमातंट्यांबाबत निर्णय घेण्यापूर्वी आपण मंत्रिमंडळातील आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांशी विचारविनिमय करू असे श्री. चव्हाण यांनी सांगितले. गोव्याचे विलीनीकरण व म्हैसूर-महाराष्ट्र सीमावाद हे प्रश्न सुटण्यात आता काही अडचण राहिलेली दिसत नाही. कारण या प्रकरणी प्रश्न सोडवण्याचे मुद्दे निश्चित करण्यात आले असून आवश्यक ती यंत्रणा कार्यभूतही झाली आहे.

(१४ नोव्हेंबर १९६६)

यशवंतराव चव्हाण गृहमंत्री