बिबी जागीर कौर यांची पुन्हा घरवापसी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
बिबी जागीर कौर यांची पुन्हा घरवापसी
चंडीगड : शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या माजी अध्यक्षा आणि तीन वेळा आमदार राहिलेल्या बिबी जागीर कौर (७२) यांनी रविवारी शिरोमणी अकाली दलात पुन्हा प्रवेश केला. पक्षाध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी बेगोवाल येथे त्यांचे स्वागत केले. नोव्हेंबर २०२२ मध्ये हकालपट्टी झाल्यानंतर आणि मार्च २०२४ मधील प्रवेशानंतर त्यांची ही दोन वर्षांतील दुसरी घरवापसी आहे.

‘तृणमूल’ नेत्याला
हिंसाप्रकरणात अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील २०२१ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या हिंसाचारप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते अब्दुल करीम खान यांना पोलिसांनी रविवारी अटक केली. अनुब्रत मंडल यांचे निकटवर्तीय असलेल्या खान यांच्यावर ३२ गुन्हे दाखल असून ते दीर्घकाळ फरार होते. बोलपूर येथील पक्ष कार्यालयाबाहेर सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली.

चमोली परिसरात नव्याने हिमवृष्टी

गोपेश्वर (उत्तराखंड) : बद्रीनाथ धामचे दरवाजे सोमवारी संध्याकाळी बंद होण्यापूर्वी रविवारी चमोली जिल्ह्यातील उंच शिखरांवर नव्याने हिमवृष्टी झाली. यामुळे तापमानात मोठी घट झाली असून संपूर्ण परिसर बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकला गेला आहे. हवामान विभागाने (आयएमडी) ३,००० मीटरपेक्षा उंच भागात पाऊस व हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला असून भाविक या निसर्गसौंदर्याचा आनंद घेत आहेत.

काँग्रेस आमदारासह सहा जणांवर गुन्हा

पिठोरगड : उत्तराखंडमधील जौलजीबी मेळाव्यादरम्यान गोंधळ घालणे आणि पोलिसांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी काँग्रेस आमदार हरीश सिंह धामी यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या कार्यक्रमानंतर मेळा समितीचे अध्यक्ष असलेल्या हरीश धामी व त्यांच्या समर्थकांनी आक्षेपार्ह घोषणाबाजी व तोडफोड केल्याचा आरोप आहे.

े