उष्णतेपासून बचावासाठी ‘कूल रूफ’

Contributed by: मुंबई,म. टा. विशेष प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
उष्णतेपासून बचावासाठी ‘कूल रूफ’
वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गरीब महिलांना बसतो. त्यांना उष्णतेपासून संरक्षण देण्यासाठी घरांच्या छतांवर उष्णता परावर्तित करणारा विशेष रंग लावण्याचे काम करणाऱ्या भारतातील ‘महिला हाउसिंग ट्रस्ट’ने प्रतिष्ठेच्या ‘अर्थशॉट प्राइझ २०२६’च्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.

बिजल ब्रह्मभट्ट यांनी १९९४मध्ये अहमदाबादमध्ये ही संस्था स्थापन केली. वस्त्यांमध्ये काम करताना स्वच्छतागृहे, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत समस्यांबरोबरच उष्णतेमुळे महिलांना होणाऱ्या आरोग्यविषयक आणि आर्थिक नुकसानीची जाणीव त्यांना झाली. त्यानंतर २०१५पासून संस्थेने ‘ कूल रूफ ’ उपक्रमावर भर दिला. या उपक्रमांतर्गत छतांवर विशेष परावर्तित रंग लावून घरातील तापमान कमी केले जाते. त्यामुळे उष्णतेचा ताण, त्वचेच्या समस्या, मासिक पाळीच्या काळातील स्वच्छतेशी संबंधित अडचणी आणि अन्नपदार्थ खराब होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे ब्रह्मभट्ट यांनी सांगितले. संस्थेने आतापर्यंत देशातील सुमारे १० राज्यांमध्ये कामाचा विस्तार केला असून, सुमारे ३६ हजार ५०० महिलांना या उपक्रमाचा लाभ झाला.
हवामान बदलाशी सामना करण्यासाठी नवोन्मेषी उपाय शोधणाऱ्या अशाच प्रकल्पांमध्ये अर्जेंटिनाच्या १६ वर्षीय फ्रँको विआऊ याच्या ‘सॅटेलाइट्स ऑन फायर’ उपक्रमाचाही समावेश आहे. वणव्यांचा लवकर शोध घेण्यासाठी त्याने २०२०मध्ये उपग्रहाधारित यंत्रणा विकसित केली. सध्या पाच खंडांतील २१ देशांमधील ९२ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर या प्रणालीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते.

७० हजारांहून अधिक वापरकर्ते या प्रणालीशी जोडले असून, दरवर्षी दोन हजारांहून अधिक वणव्यांच्या घटनांमध्ये मदत होते. दुर्गम भागांत आग लागल्याचे समजण्यास उशीर होतो. ही समस्या लक्षात घेऊन फ्रँको आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वनरक्षक व अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांशी चर्चा करून ही यंत्रणा विकसित केली. नासा, अमेरिकेची राष्ट्रीय महासागरीय आणि वातावरणीय प्रशासन संस्था आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या उपग्रहांमधील माहितीचे विश्लेषण या प्रणालीत केले जाते.

दर पाच मिनिटांनी १३ उपग्रहांची माहिती तपासून संभाव्य वणव्यांचा शोध घेतला जातो. आग आढळल्यास संबंधित यंत्रणांना तत्काळ सूचना पाठवली जाते. नासाच्या जागतिक वणवा शोध यंत्रणेच्या तुलनेत सरासरी ३५ मिनिटे आधी आगीचा शोध घेता येतो, असा दावा फ्रँकोने केला.

हेही वाचा

अमेरिकेतील सर्वांत मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या जेपी मॉर्गन चेसमध्ये सोमवारी तांत्रिक बिघाड झाला. त्याचा परिणाम देशाच्या वित्तीय व्यवस्थेवर झाला असून, हजारो ग्राहकांना अनेक प्रमुख अमेरिकी बँकांमधील ऑनलाइन खात्यांमध्ये प्रवेश करताना अडचणी आल्या. ‘झेले’ या पैसे हस्तांतरण सेवेलाही व्यवहारांमध्ये विलंबाचा सामना करावा लागला. या गोंधळाबाबत...

अमेरिकेतील सर्वांत मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या जेपी मॉर्गन चेसमध्ये सोमवारी तांत्रिक बिघाड झाला. त्याचा परिणाम देशाच्या वित्तीय व्यवस्थेवर झाला असून, हजारो ग्राहकांना अनेक प्रमुख अमेरिकी बँकांमधील ऑनलाइन खात्यांमध्ये प्रवेश करताना अडचणी आल्या. ‘झेले’ या पैसे हस्तांतरण सेवेलाही व्यवहारांमध्ये विलंबाचा सामना करावा लागला. या गोंधळाबाबत...