छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर जयभवानी चौकात राहणाऱ्या डॉक्टराच्या घराच्या किचनच्या दरवाज्याचे कुलूप तोडून, चोरट्यांनी घरातून नऊ लाख ७० हजार रुपये आणि ४५ हजार रुपये रोख रकमेसह २५ हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही चोरून नेला. ही घटना १२ नोव्हेंबरच्या सकाळी ६.३० वाजता ते १३ नोव्हेंबरच्या सकाळी नऊ या दरम्यान घडली.
या प्रकरणी राजेंद्र झुंबरलाल काला (वय ५८, रा. आरएल १३०, जयभवानी चौक, बजाजनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राजेंद्र काला डॉक्टर आहेत. त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यांच्या घरातून नऊ लाख रुपये रोख रक्कम (सर्व नोटा ५०० च्या) आणि ४५ हजार रुपयांच्या शंभरच्या नोटा, तसेच २५ हजाराचा एलईडी टीव्ही चोरून नेला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील हे करीत आहेत.