कर्करुग्णालयामध्ये जटील शस्त्रक्रिया

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
कर्करुग्णालयामध्ये जटील शस्त्रक्रिया
शासकीय कर्करुग्णालयातील डोके व मान शल्यचिकित्साशास्त्र विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुसरे शस्त्रक्रिया शिबिर सोमवार ते बुधवार (१६ ते १८ नोव्हेंबर) या कालावधीत होत असून, शिबिरामध्ये या विषयातील ८ ते १० जटील शस्त्रक्रिया होणार आहेत. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या उपस्थितीत संबंधित विषयावर मंथनही होणार असल्याचे कळवण्यात आले आहे.

‘हेड अँड नेक ऑन्कॉलॉजी’ या वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रात शैक्षणिक व वैद्यकीय अनुभवांची देवाण-घेवाण व्हावी आणि शस्त्रक्रियात्मक कौशल्ये वृद्धींगत व्हावी, या उद्देशाने आयोजित शिबिरात इंग्लंड येथील डॉ. जोनाथन ह्यूजेस व डॉ. विजेंद्र इंगळे हे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहभागी होत आहेत. घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन सोमवारी सकाळी ११ वाजता शासकीय कर्करुग्णालयातील सभागृहात होणार आहे. शिबिरात या विषयातील ११ व्याख्याने होतील, तर मंगळवारी व बुधवारी या विषयातील आठ ते दहा जटील शस्त्रक्रियाही होतील. शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सुक्रे, कर्करुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड व विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांनी केले आहे.