अमेरिकेच्या रडारवर इराणचा ड्रोन हल्ला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
irans drone attack on america the start of new tensions
तेहरान : इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (आयआरजीसी) रविवारी दावा केला, की त्यांच्या एरोस्पेस दलाने गेल्या काही तासांत बहरीनमधील अमेरिकेच्या हवाई संरक्षण रडार केंद्रावर ड्रोन हल्ला केला. अल-रिफा हेलिकॉप्टर तळावरील रडार प्रणालीवर सहा ड्रोनच्या साह्याने हा हल्ला करण्यात आला.

अमेरिकन लष्कराने इराणविरुद्ध केलेल्या आक्रमकतेला दिलेले हे चोख प्रत्युत्तर असून, हा मोहिमेचा दुसरा टप्पा असल्याचे ‘आयआरजीसी’ने त्यांच्या अधिकृत वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘जहाजांना संरक्षण देण्याच्या नावाखाली होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल तस्करी करण्याचा अमेरिकेचा डाव पूर्णपणे फसला आहे. ही सामुद्रधुनी बंद असल्याच्या वास्तवावरून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी अमेरिका लहान आणि दिशाभूल करणाऱ्या कारवाया करीत आहे,’ असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. ‘अमेरिकेच्या कोणत्याही आक्रमणाला यापेक्षाही कठोर प्रत्युत्तर दिले जाईल,’ असा इशाराही इराणने दिला. ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अनधिकृत मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तेलवाहू टँकरना सागरी सुरुंगांचा धक्का बसून त्यांचा स्फोट झाल्याची माहिती ‘आयआरजीसी’ नौदलाने रविवारी दिली.