Losses Faced By Farmers In Marathwada Due To Rain Assessments Completed
नुकसानीचे पंचनामे पूर्ण
Contributed by: छत्रपती संभाजीनगर,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मराठवाड्यात अपुरा पडलेल्या पावसामुळे खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. मराठवाड्यातील ४८ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या ५३ लाख ४७ हजार ८०४ हेक्टरवरील खरिपाचे नुकसान झाले आहे. शासन आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे सुरू होते. पंचनाम्यांचे काम आता १०० टक्के पूर्ण झाले आहे.
एवढेच नव्हे तर केंद्राचे एनडीआरएफचे पथकही पाहणी करून गेले आहेत. त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष प्रत्यक्ष मदतीकडे आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पेरणी करता यावी, यासाठी शासनाने अग्रिम रक्कम म्हणून पाच हजार रुपये वितरितही केले आहेत.मराठवाड्यास यंदा तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सर्वदूर अपेक्षित पाऊस झाला नाही आणि जलस्रोत आटलेल्या गावांची तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना जूननंतरदेखील टँकरचा आधार घ्यावा लागला आहे. एकीकडे टँकरच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जाणाऱ्या खरीप हंगामावरही पाण्याअभावी संकट कोसळले आहे. जून महिना पावसाच्या प्रतीक्षेत गेला त्यानंतर अपवाद वगळता सर्वदूर दमदार पाऊस झाला नाही. त्यात पिके वाढीवर असतानाच अनेक मंडळात पावसाचा मोठा खंड पडला. पिकांवर मोठा परिणाम झाला.
दरम्यान, पर्जन्यतूट आणि अन्य घटकांमुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील तालुक्यांत प्रथम कळ लागू झाली दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, यासाठी नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून कामाला लागली असून हे काम आता पूर्ण झाले आहे,
मराठवाड्यात खरीप पिकांसह फळबाग आदींचे लागवड क्षेत्र असलेल्या ५३ लाख ४७ हजार ८०४ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण पूर्ण झाले आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ लाख २० हजार ४२३ हेक्टर, जालना जिल्ह्यातील ६ लाख ५५ हजार ६३७ हेक्टर, बीड जिल्हातील सात लाख ८७ हजार २१८ हेक्टर, लातूर जिल्ह्यातील सहा लाख ४६ हजार ४४७, धाराशिव जिल्ह्यातील सहालाख ६४ हजार १० हेक्टर , नांदेड जिल्ह्यातील आठ लाख २७ हजार ७० हेक्टर, परभणी जिल्ह्यातील पाच लाख ५२ हजार ४३३ हेक्टर तर हिंगोली जिल्ह्यातील ३ लाख ९४ हजार ५६५ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीमचे ५ हजार रुपये जमा झाले. आता नुकसानीचे पंचनामे देखील १०० टक्के पूर्ण झाले असून आता एनडीआरएफच्या निकषानुसार किंवा त्यापेक्षा वाढीव मदत केव्हा जाहीर होणार आणि मदत निधी खात्यात केव्हा जमा होणार याकडे बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.