बिडकीन औद्योगिक क्षेत्रासाठी भविष्यातील गरज लक्षात घेऊन करमाड ते बिकडीन स्वतंत्र रेल्वे जोडणी विकसित करावी, शेंद्रा, बिडकीन, वाळूज व परिसरातील औद्योगिक क्षेत्रांना रेल्वे जाळे, प्रमुख बंदरे, ड्रायपोर्टशी जोडण्यासाठी आराखडा तयार करावा, अशी मागणी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड ॲग्रीकल्चर (सीएमआयए) कार्यालयात दक्षिण मध्य रेल्वे, उद्योजकांची विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. त्यात उद्योग व रेल्वेशी निगडित विविध विषयांवर चर्चा झाली.बैठकीसाठी सीएमआयए पदाधिकाऱ्यांसह जेएसडब्ल्यू मोटर्स, एथर एनर्जी, एंड्यूरन्स, अभिषेक ग्रुप, टोयोटा किर्लोस्कर मोटरचे प्रतिनिधी तर दक्षिण मध्य रेल्वेचे एस. सूर्यवंशी, के. प्रशांत स्वामी, सुलतान रमजानी आदींची उपस्थिती होती.
सुरुवातीला सीएमआयएच्या वतीने ’इंडस्ट्रिअल फ्रेट पोटॅन्शिअल असेसमेंट’ या विषयावर सादरीकरण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर व परिसरातील ऑटोमोबाइल, इलेक्ट्रिक वाहननिर्मिती, पोलाद, धातू उद्योग, औषधनिर्माण, कृषी अभियांत्रिकी क्षेत्रांच्या मालवाहतुकीच्या गरजांचा आढावा घेतला गेला. बिडकीन औद्योगिक क्षेत्रात टोयोटा किर्लोस्कर मोटर, जेएसडब्ल्यू मोटर्स, एथर एनर्जी सारखे प्रकल्प साकारत असल्याने भविष्यात मालवाहतुकीची मागणी वाढणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार रेल्वे मालवाहतूक सुविधांचे नियोजन करण्याबाबत सूचना करण्यात आली.