परखड; तरीही मिश्किल संसदपटू

Contributed by: राहुल गोखले|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
pilu modi the symbol of humor in parliament
सदेतील चर्चेचा स्तर दिवसेंदिवस घसरत चालल्याबद्दल सार्वत्रिक चिंता व्यक्त होत असताना, एकेकाळी संसद अनेक दिग्गज संसदपटूंनी आपल्या ओजस्वी भाषणांनी गाजवली होती, याचे स्मरण प्रकर्षाने झाल्याखेरीज राहत नाही. अटलबिहारी वाजपेयी, बॅरिस्टर नाथ पै, मधू दंडवते, मधू लिमये, हिरेन मुखर्जी असे संसदपटू आपल्या वक्तृत्वाने संसदेची प्रतिष्ठा उंचावत होते. अर्थात, काही असेही संसदपटू होऊन गेले, जे आज काहीसे विस्मरणात गेले असले, तरी संसदेतील वादचर्चांची उंची वाढवण्यात त्यांचे योगदान मोलाचे होते. याच मांदियाळीत आवर्जून घ्यावे असे एक नाव म्हणजे पिलू मोदी .

मार्मिक विनोदाचा स्पर्श लाभल्यामुळे त्यांचे वक्तृत्व खुमासदार होत असे. त्यांच्या विनोदाला अनेकदा उपरोधाची धार असल्याने ज्यांच्यावर तो प्रहार असे, त्यांना तो अधिकच टोचत राही. अर्थात, त्यात व्यक्तिगत चिखलफेकीचा हेतू नसल्याने, त्या वक्तृत्वास सवंगपणाचा दर्प येत नसे. संसदेने प्रकाशित केलेल्या स्मरणिकांपैकी अनेकांमध्ये पिलू मोदी यांच्या नावाचा उल्लेख प्रभावी वक्ता व संसदपटू म्हणून असणे, हा योगायोग नव्हे. पिलू मोदी यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९२६ रोजीचा. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी उमटविलेल्या ठशाचे स्मरण औचित्याचे ठरेल.
पिलू मोदी यांचे वडील सर होमी मोदी हे सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. सन १९०८मध्ये त्यांनी ‘भारताचे राजकीय भवितव्य’ या विषयावर लिहिलेल्या निबंधाला पारितोषिक मिळाले होते. मुंबई महापालिकेपासून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. ते पुढे उत्तर प्रदेशचे काही काळ राज्यपालही राहिले. होमी मोदींचे तिन्ही चिरंजीव कर्तृत्वान होते. रुसी मोदी हे ‘टाटा आयर्न अँड स्टील’चे (टिस्को) अध्यक्ष होते. काली मोदी हे नामवंत उद्योगपती व भारतातील ‘क्रेडिट कार्ड क्रांती’चे प्रणेते होते, तर पिलू मोदी हे एक नामांकित वास्तुविशारद होते. शालेय शिक्षण ‘डून स्कूल’मधून झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील जे. जे. कला महाविद्यालयात प्रवेश घेतला; पण तेथे ते जेमतेम दीड वर्षच राहिले. याचे कारण म्हणजे, ‘लाइफ’ या प्रसिद्ध मासिकात कॅलिफोर्नियाच्या वास्तुकलेवर आलेला एक लेख. पिलू मोदींचा कल लहानपणापासूनच वास्तुकलेकडे होता. त्या लेखाने त्यांना कॅलिफोर्नियाला जाण्यास प्रेरित केले व त्यांनी बर्कलेस्थित कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रवेश घेतला. ते विद्यापीठ म्हणजे नवविचारांचे व नवकल्पनांचे उद्गमस्थान होते, असे त्यांनी आपल्या आठवणींत म्हटले होते. १९५३ मध्ये ते भारतात परतले आणि एक यशस्वी वास्तुरचनाकार म्हणून त्यांची कारकीर्द जोमाने घडू लागली.

१९५०-६०च्या दशकात पिलू मोदी यांनी दिल्लीतील ‘ओबेरॉय हॉटेल’पासून तेव्हाच्या कलकत्त्यातील ‘आयुर्विमा इमारती’पर्यंत आणि ‘टेल्को’च्या कार्यालयीन इमारतींपासून ‘मुकुंद आयर्न अँड स्टील’; तसेच ‘सँडोज’पर्यंत अनेक कॉर्पोरेट इमारतींच्या बांधकामात वास्तुरचनाकार म्हणून भूमिका बजावली. वास्तुकलेबरोबरच त्यांना राजकारणातही रुची होती. अमेरिकेचे आणि मुक्त अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते असणारे मोदी हे १९५९मध्ये सी. राजगोपालचारी व मिनू मसानी यांच्यासह ‘स्वतंत्र पक्ष’ या उजव्या विचारसरणीच्या पक्षाचे सह-संस्थापक होते. सन १९६७च्या निवडणुकीत ते गुजरातच्या गोध्रा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. सन १९७१मध्ये ते पुन्हा विजयी झाले. १९७८मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले आणि निधनापर्यंत, म्हणजेच १९८३पर्यंत मोदींनी संसद गाजवली.

त्यांची भाषणे परखड असत; पण त्यांत मिश्किलपणाही असे. एकदा एका खासदाराचे भाषण ऐकून मोदी यांनी त्या सदस्याने ‘भुंकणे थांबवावे’ (बार्किंग) असा उल्लेख केला, तेव्हा संतापलेल्या सदस्याने तो असंसदीय शब्द कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. त्यावर मोदींनी ‘रेकणे थांबवा’ (ब्रेयिंग) असा शब्दप्रयोग खुबीने केला. त्या शब्दाचा अर्थ त्या सदस्याला ठाऊक असल्याने तो शब्द कामकाजात कायम राहिला. सभागृहात बोलताना मोदींनी मंत्र्यांकडे पाठ केली आणि मंत्र्याचा अपमान केला असा आरोप झाला, तेव्हा मोदींनी ‘आपल्याला पुढची बाजू, मागची बाजू असे काही नाही, आपण गोल आहोत,’ असे सांगून स्वतःच्या स्थूलपणावर कोटी केली; तो उमदेपणा त्यांच्यात होता. भारताने आपला पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ अवकाशात सोडला, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव करणारी भाषणे सुरू असताना पिलू मोदी उठले आणि म्हणाले, ‘पंतप्रधान महोदया, आपल्या शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञानात मोठी झेप घेतली आहे हे मला मान्य आहे; पण मग आपले टेलिफोन का नीट काम करीत नाहीत यावर आपण काही प्रकाश टाकलात तर मी उपकृत होईन.’ विसंगतीवर बोट ठेवण्यासाठी मोदी विनोदाचा किती अचूक उपयोग करीत असत, याचे हे उत्तम उदाहरण. काँग्रेसचे नेते मोदी यांना ‘वाशिंग्टनचे पोपट’ म्हणून हिणवत असत. एके दिवशी मोदी गळ्यात ‘मी सीआयए एजंट आहे’ अशी पाटी अडकवून सभागृहात आले. ती पाटी काढून टाकण्याचे निर्देश सभापतींनी दिल्यानंतर त्यांनी ती पाटी काढली आणि ‘आता मी सीआयए एजंट नाही,’ अशी मल्लिनाथी केली. मोदी यांच्या विनोदबुद्धीची झलक त्यांच्या लेखनातही दिसून येत असे. ते इंदिरा गांधी यांना पत्रांमध्ये ‘आय.जी.’ म्हणून संबोधित आणि खाली ‘पीएम’ (पिलू मोदी) अशी स्वाक्षरी करत. ‘मी कायमस्वरूपी पीएम आहे, तुम्ही तर तात्पुरत्या पीएम (पंतप्रधान) आहात,’ असे ते इंदिरा गांधींना म्हणत. आणीबाणीच्या काळात मोदी यांना रोहतक तुरुंगात सोळा महिने डांबण्यात आले होते. इंदिरा राजवटीने त्यांची काही अटींवर तुरुंगातून सुटका करण्याची तयारी दर्शवली, तथापि अटी मान्य करण्यास मोदी यांनी नकार दिला.

पाकिस्तानचे पंतप्रधान झालेले झुल्फिकार अली भुट्टो हे पिलू मोदी यांचे घनिष्ट मित्र होते. ‘झुल्फी माय फ्रेंड’ नावाचे पुस्तकही मोदी यांनी लिहिले. मोदी यांनी पाकिस्तानमध्ये अनेकदा दौरे केले. अशाच एका दौऱ्यादरम्यान त्यांची भेट पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष फील्ड मार्शल अयूब खान यांच्याशी झाली. त्या वेळी पाकिस्तानची नवी राजधानी साकारण्याचे काम सुरू होते. अयूब खान यांच्याशी झालेल्या भेटीत मोदी यांनी त्यांना सूचना केली, ‘नवीन राजधानीला केवळ ‘पाकिस्तानची राष्ट्रीय राजधानी’ असे नाव योग्य दिसत नाही, तर कोणते तरी स्फूर्तिदायक नाव देणे गरजेचे आहे.’ मोदी भारतात परतले आणि तिकडे अयूब खान यांनी नव्या राजधानीस ‘इस्लामाबाद’ हे नाव दिल्याचे घोषित केले. हे आपल्या सूचनेवरून झाले हे मान्य करण्यास मोदी अगोदर तयार नव्हते; पण अयूब खान यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदींनी केलेल्या सूचनेचा आवर्जून उल्लेख केला. एका अर्थाने पाकिस्तानच्या राजधानीला ‘इस्लामाबाद’ हे नाव मिळण्यात पिलू मोदी यांच्या सूचनेचा वाटा होता असेच म्हटले पाहिजे.

संसदेत आशयापेक्षा अभिनिवेश वरचढ ठरत असताना, खेळीमेळीच्या वातावरणाची जागा विखाराने घेतली असताना आणि एकूणच राजकारणातून विनोद नाहीसा होत असताना परखड भूमिका; तरीही युक्तिवादात प्रभावी शस्त्र म्हणून विनोदाचा नेमका उपयोग करण्याची हातोटी, या वैशिष्ट्यांमुळे पिलू मोदी यांचे स्मरण आणि कदाचित अनुकरणही वर्तमानातही श्रेयस्कर ठरेल.

(लेखक राजकीय घडामोडींचे अभ्यासक आहेत.)