राजस्थान स्फोटप्रकरणात दोन अटकेत

Contributed by: जयपूर,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
राजस्थान स्फोटप्रकरणात दोन अटकेत
रामसिंगपूर येथे ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या रेल्वे रुळावरील स्फोट प्रकरणातील दोन संशयित आरोपींना पंजाबमधील गुरुदासपूर येथून अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात ते पाकिस्तानी हस्तक असल्याचे समोर आले आहे, असे पोलिसांनी रविवारी सांगितले.

महकदीप कौर आणि देवेंद्र सिंग अशी या आरोपींची नावे असून, राजस्थान दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि श्री गंगानगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौर ही शाह नावाच्या पाकिस्तानी सूत्रधाराच्या संपर्कात होती आणि तिने तिच्या साथीदारासोबत मिळून रामसिंगपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे रुळावर स्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता. स्फोट घडवून आणण्यासाठी मिळालेल्या दोन विदेशी बनावटीच्या पिस्तुली, ४६ जिवंत काडतुसे आणि तीस हजार रुपये त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एडीजीपी दिनेश एम. एन. यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गंगानगरचे एसपी हरिशंकर यांच्या नेतृत्वाखाली एक संयुक्त पथक स्थापन करून या प्रकरणात तपास करण्यात आला. तपासात गुरुदासपूरचे रहिवासी महकदीप कौर आणि देवेंद्र सिंग यांचा सहभाग असल्याचे समोर आले. प्राथमिक तपासात कौरचा पती करणवीर सिंग याला यापूर्वी पंजाबमध्ये अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याच्या अटकेनंतर कौर ही पाकिस्तानस्थित सूत्रधारांच्या संपर्कात आली, असे पोलिसांनी सांगितले.

आरोपींना ऑनलाइन माध्यमातून पैसे मिळाले आणि ते सोशल मीडियावर सक्रिय गुन्हेगारांचे प्रोफाइल फॉलो करीत असल्याचे आढळले, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, महकदीप ही दोन दिवसांपूर्वी घराबाहेर पडली आणि स्फोटानंतर तीन दिवसांनी परतल्याची माहिती तिच्या पालकांनी दिली.