डेटिंग ॲपवरून ओळख झालेल्या महिलेने, ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास, तसेच विविध उत्पादनांना रेटिंग आणि रिव्ह्यू दिल्यास चांगले कमिशन मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची सुमारे १८ लाखांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार ठाणे जिल्ह्यात समोर आला आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी महिलेसह अन्य एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदाराची डेटिंग ॲपद्वारे आरोपी महिलेशी ओळख झाली होती. टास्क आधारित अर्धवेळ नोकरी करत असून त्यातून चांगले पैसे मिळतात, असेही तिने तक्रारदाराला सांगितले. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने संबंधित काम करण्याची तयारी दर्शवली. सुरुवातीला तक्रारदाराकडून २० हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर संकेतस्थळावर दिसणाऱ्या उत्पादनांना रेटिंग आणि रिव्ह्यू दिल्यानंतर त्याचे कमिशन त्यांच्या संकेतस्थळावरील वॉलेटमध्ये जमा होत होते. त्यानंतर त्याला आणखी ३० हजार रुपयांचा फंड जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदाराने पैसे जमा केले.तक्रारदाराने त्यानंतर १७ लाख ९६ हजार रुपयांची गुंतवणूक केली.