शेअर बाजार प्रशिक्षक अवधूत साठे आणि त्यांच्या कंपनीने, ‘अवधूत साठे ट्रेडिंग ॲकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड’ने (एएसटीएपीएल), ‘ सिक्युरिटीज अपिलेट ट्रिब्युनल ’कडे (सॅट) धाव घेतली आहे. ‘ सेबी ’ने साठे आणि कंपनीला ५४६.१७ कोटी रुपये परत करण्याचे, तसेच त्यावर ६७.८७ कोटी रुपयांचे व्याज भरण्याचे निर्देश दिले आहेत.
सोमवारी या प्रकरणाचा न्यायाधिकरणासमोर उल्लेख करण्यात आला. साठे यांच्या वकिलांनी मंगळवारी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. नियामकाच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगताना, ‘प्रशिक्षणवर्ग चालवणाऱ्या व्यक्तीला गेल्या पाच वर्षांत मिळालेली संपूर्ण शुल्करक्कम परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’ असा युक्तिवाद त्यांनी केला.‘सेबी’चा आरोप काय?
‘सेबी’ने २३ ऑक्टोबर २०२६च्या अंतिम आदेशात अवधूत साठे आणि ‘एएसटीएपीएल’ला आवश्यक नोंदणीशिवाय गुंतवणूक सल्ला व संशोधन विश्लेषक सेवा दिल्याबद्दल दोषी ठरवले. शेअर बाजार शिक्षणाच्या नावाखाली ही सेवा देण्यात आल्याचा आरोप आहे. साठे आणि त्यांच्या पथकाने प्रशिक्षण सत्रांमध्ये; तसेच ‘व्हॉट्सॲप’ समूहांद्वारे विशिष्ट समभागांबाबत शिफारशी, अपेक्षित किमतीतील हालचाली, खरेदी-विक्रीची पातळी आणि ‘स्टॉप-लॉस’चे मार्गदर्शन केले. दिशाभूल करणारे नफ्याचे दावे करून सहभागी आकर्षित केल्याचा आरोपही आहे.
साठे यांनी आपण केवळ शैक्षणिक संस्था चालवत असल्याचे सांगितले. सहभागी स्वतःच्या जोखमीवर व्यवहार करीत होते आणि घेतलेली रक्कम अभ्यासक्रमाचे शुल्क होते, असा त्यांचा दावा आहे. संपूर्ण उत्पन्नाला बेकायदा नफा मानणे अवाजवी असल्याचेही त्यांनी म्हटले. ‘सेबी’ने हा युक्तिवाद फेटाळून साठे आणि कंपनीला दोन वर्षे किंवा परतफेड पूर्ण होईपर्यंत बाजारबंदी केली. साठेंवर चार कोटी आणि कंपनीवर सहा कोटींचा दंड ठोठावला.
गौरी साठे यांच्यावरही कारवाई
देखरेखीत अपयशी ठरल्याबद्दल गौरी साठे यांना जबाबदार धरण्यात आले. त्यांच्यावर सहा महिन्यांसाठी भांडवली बाजारात प्रवेशबंदी घालण्यात आली. मात्र, बेकायदा नफ्यात त्यांचा थेट सहभाग असल्याचे सिद्ध करण्यास आधार नसल्याचे सांगून ‘सेबी’ने त्यांना परतफेडीसाठी जबाबदार धरले नाही. त्यांना स्वतंत्रपणे १.५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या प्रकरणातील एकूण आर्थिक दंडाची रक्कम ११.५ कोटी रुपये आहे.