Ambedkar Comforts Pathare Family On Rohit Pathares Tragic Death
पठारे कुटुंबीयांचे केले सांत्वन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
वैजापूर : रोहित अनिल पठारे यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी १६ नोव्हेंबरला सायंकाळी वैजापूर येथे रोहित पठारे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या वेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून या कठीण प्रसंगी संपूर्ण आंबेडकरी चळवळ आणि संघटना पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभ्या असल्याचा विश्वास दिला.
यानंतर त्यांनी वैजापूरचे पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांची भेट घेऊन तपासाची सद्यस्थिती, आरोपींना अटक करण्यासाठी करण्यात आलेली कारवाई आणि पुढील तपासाबाबत माहिती घेतली. या प्रसंगी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक प्रवीण जाधव यांच्याशीही त्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. पोलिसांच्या कामगिरीबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.मात्र, एसआयटीच्या तपासाबाबत स्थानिक नागरिकांकडून काही प्रश्न उपस्थित केले जात असल्याची बाबही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यावर त्यांनी पोलिस अधीक्षक प्रवीण जाधव यांच्याकडे एसआयटीमधील दोन अधिकाऱ्यांना बदलण्याची मागणी केली. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा विलंब न करता लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करावे आणि खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. २२ नोव्हेंबरच्या रस्ता रोको आंदोलनात सहभागी होण्याच आवाहन करण्यात आले.
या वेळी ॲड. भंडारे, ॲड. राजारामजी बडगे, यू. जी. बोराडे, महासचिव अशोक केदारे, शांताराम रणशूर, अतिश त्रिभुवन, गौतम पगारे, विजय मोकळे, यशवंतराव पडवळ, प्रा. आबासाहेब कसबे, संजय बागुल, प्रल्हाद सातोरे, राजवीर त्रिभुवन आदी उपस्थित होते.