पालखेडमध्ये घरफोडीचा प्रयत्न फसला

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,वैजापूर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
attempted burglary foiled in palakhed community security system triumphs
जिल्हा पोलिस दल छत्रपती संभाजीनगर व जिल्हा परिषदेतर्फे कार्यरत असलेल्या ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तत्परतेमुळे घरफोडी करण्याचा प्रयत्न फसल्याची घटना वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामपंचायत पालखेड येथे शनिवारी उघडकीस आली.

याबाबत अधिक माहिती अशी, पालखेड या गावात रात्री नऊ वाजता गावातील जयकृष्ण पारसनाथ शेळके यांच्या घरी परवा वर्षश्रद्धाचा कार्यक्रम झाला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा साखरपुड्याचा कार्यक्रम असल्यामुळे घरी पाहुण्यांची खूप मोठी गर्दी होती. याचाच फायदा घेऊन पाच ते सहा संशयित व्यक्ती या चोरीच्या उद्देशाने आले आहेत हे लक्षात आले. माजी सरपंच नंदकिशोर जाधव पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (१८००२७०३६००) सर्व गावाला ही माहिती कळवली. त्यामुळे तत्काळ गावकरी घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाले. संपूर्ण गाव दक्ष झाल्याने चोर तिथून पळून जाऊ लागले असता ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु अंधाराचा फायदा घेऊन चोर पळून गेले. पालखेड ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व पोलिस पाटील यांच्या प्रयत्नातून गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रभावी राबविली जात आहे.
पालखेड गावात ग्रामसुरक्षा यंत्रणेचा विविध सूचना देण्यासाठी ५९ वेळा वापर करण्यात आला आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेत जिल्ह्यातील ८४६ गावे सहभागी आहेत.जिल्ह्यातील ९.६५ लाख नागरिक यंत्रणेत सहभागी आहेत.