कन्नड येथे ‘गव्हाण बंद’ आंदोलन

Contributed by: कन्नड,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
कन्नड येथे ‘गव्हाण बंद’ आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बारामती ॲग्रो युनिट २ कारखान्यावर आक्रमक आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी कारखान्याचे मुख्य गेट तोडून कारखान्यात प्रवेश केला आणि उसाच्या गव्हाणीत ठिय्या आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी कारखान्याचे शुगरक्रशिंग; तसेच काटा बंद पाडला. सायंकाळ सहा वाजेपर्यंत तडजोड न झाल्याने आंदोलन सुरूच होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी (१६ नोव्हेंबर) कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सकाळी ११ पासून ठिय्या आंदोलन सुरू केले. व्यवस्थापनाने प्रवेशद्वारावर येऊन उसाच्या दराबाबत चर्चा करावी, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती. मात्र व्यवस्थापनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने मुख्य प्रवेशद्वारावरील गेट तोडून शेतकरी कारखान्यात शिरले आणि त्यांनी धावत जावून गव्हाणीत उड्या घेऊन गव्हाण बंद पाडली. यामुळे उसाच्या गव्हाणीच्या जवळ काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य भाऊसाहेब थोरात, दिनकर पवार, कृष्णा साबळे, प्रकाश बोरसे, रामेश्वर भुसारे, शिवाजीराव बचाटे, राजू बोंगाणे यांच्यासह डॉ. अण्णासाहेब शिंदे आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चालू गळीत हंगाम २०२६-२७ साठी प्रतिटन तीन हजार ९०० रुपये पहिली उचल जाहीर करावी, मागील हंगामातील नफ्यातून प्रतिटन १०० रुपये शेतकऱ्यांना द्यावेत, वाहतूक खर्चापोटी प्रतिटन २०० रुपये द्यावेत, अशा मागण्या स्वाभिमानी संघटनेने केल्या होत्या. या मागण्या १५ नोव्हेंबरपर्यंत मान्य न झाल्यास १६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता कारखान्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला होता. मागण्यांचे निवेदन मुख्य व्यवस्थापक मिलिंद देशमुख यांना देण्यात आले होते.