‘सीएम फडणवीस हेच मफलरमॅन’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
cm fadnavis and the muffler man controversy exposed
(पान १ वरून)

(पान १ वरून)
त्याच मालिकेतील सहावी पत्रकार परिषद सोमवारी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे घेणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले होते.

रोहित पवार यांनी अजित पवार ज्या विमानात प्रवास करीत होते, त्या व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंह, त्यांची दोन मुले रोहित आणि राहुल सिंह यांचे अमेरिकेत अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्यांशी संबंध असल्याचा दावा केला; तसेच त्यांचे देशाचे नागरी हवाई वाहूतकमंत्री के. राममोहन नायडू यांच्याशीही चांगले संबंध असल्याचा दावा केला.

राज्यात नोव्हेंबर २०२४मध्ये विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू होती, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार होता. त्यातही तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका उद्योगपतीच्या विशेष विमानाने जयपूरला रोहित सिंह याच्या लग्नाला गेल्याचे रोहित पवार म्हणाले. त्या लग्नात दाखल होताना फडणवीस यांनी गळ्यात मफलर घातलेला फोटो त्यांनी दाखवला.

राज्यातील सर्व राजकारण्यांची विधानसभेचे निकाल काय लागणार याविषयी उत्सुकता ताणली गेली असताना २१ नोव्हेंबरच्या रात्री फडणवीस जयपूरला जाऊन परतले, असा दावा पवार यांनी केला.

‘एप्रिल २०२६मध्येही दिल्लीत एका लग्नात फडणवीस आणि व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंह यांची भेट झाली. त्या वेळी सिंह यांनी फडणवीसांना एक फाइलही दिली, नेमके त्यात काय होते, याची माहिती उघड करावी,’ असेही पवार म्हणाले. व्हीएसआर कंपनीला भाड्यापोटी मिळणारी रक्कम राज्य सरकारने कधीच थकवून ठेवली नाही. अजित पवार यांच्या अपघातानंतरही साडेनऊ महिन्याच्या काळात १६८.९२ कोटी रुपये देण्यात आल्याचीही माहिती या वेळी पवार यांनी दिली.

अजित पवार यांच्या पहिल्या पुण्यतिथीआधी अपघाताचा अहवाल येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असले, तरी त्यात नेमके काय दाखवले जाते, वैमानिकावरच खापर फोडले जाते हे पाहूच, असेही रोहित पवार या वेळी म्हणाले.

राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ने-आण करण्यासाठी विमान उपलब्ध करून देताना त्या कंपनीची पार्श्वभूमी स्वच्छ असावी; त्यांच्यावर कुठलीही चौकशी प्रलंबित नसावी अशा अटी घालणारी एक निविदा महायुती सरकारच्या काळात अजित पवार यांच्या पुढाकाराने काढण्यात येणार होती. ही निविदा निघाल्यावर साहजिकच व्हीएसआर कंपनी विमान पुरवण्यापासून दूर झाली असती; पण निविदेची माहिती मिळताच व्हीएसआरचे मालक व्ही. के. सिंह स्वतः मंत्रालयात आले आणि त्यांनी अक्षरशः भांडण करून, ती निविदा रद्द केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. ती निविदा रद्द झाली नसती, तर अजित पवार आज आपल्यात असते, असेही या वेळी पवार म्हणाले.