पालघरमधील पारंपरिक मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सातपाटी गावाला किनारपट्टीची तीव्र धूप होत असल्याचा धोका निर्माण झाला आहे. सुमारे ३५ हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील किनाऱ्याची गेल्या १४ महिन्यांत सहा ते आठ फूट जमीन समुद्रात वाहून गेल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. किनाऱ्यावरील दोन नारळाची झाडेही समुद्रात कोसळली आहेत. त्यामुळे मच्छिमारांची घरे, उपजीविकेची साधने आणि गावाच्या अस्तित्वाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
समुद्रात प्रस्तावित असलेल्या ‘जेएसडब्ल्यू’च्या मुरबे बंदर प्रकल्पामुळे ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे. या प्रकल्पांतर्गत दक्षिणेकडे सुमारे दहा किलोमीटर लांबीचा भरावबंधारा (ब्रेकवॉटर) किनाऱ्याला जोडून उभारला जाणार आहे. त्यामुळे समुद्राच्या नैसर्गिक प्रवाहात आणि गाळाच्या संचयनात प्रतिकूल बदल होऊ शकतात, अशी भीती जेएसडब्ल्यू बंदरविरोधी संघर्ष समितीचे सरचिटणीस राजीव चौधरी यांनी व्यक्त केली.भरतीचे पाणी नैसर्गिक सीमा ओलांडून गावाच्या दिशेने येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.