संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. एस. आर. पाटील यांच्या निरीक्षणानुसार, श्वसनविकारांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. घशात खवखव, कोरडा खोकला, शिंका, नाक वाहणे किंवा चोंदणे, डोकेदुखी, दमा आणि ॲलर्जीचा त्रास वाढत आहे. काही रुग्णांना सतत खोकला येत असून त्यामुळे मूत्रावरील नियंत्रण सुटण्याच्या तक्रारीही दिसत आहेत. दिवाळीनंतर व्हायरल संसर्ग ाचे प्रमाणही वाढले आहे. सर्दी, खोकला, ताप आणि अंगदुखीचा त्रास पाच दिवसांपेक्षा अधिक काळ टिकल्यास केवळ व्हायरल संसर्ग समजून दुर्लक्ष करू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.प्रदूषणाचा परिणाम केवळ श्वसनसंस्थेवरच नव्हे, तर हृदय आणि डोळ्यांवरही होतो. प्रदूषित हवेमुळे फुफ्फुसांमध्ये सूज निर्माण होऊ शकते. दमा आणि फुफ्फुसांचे दीर्घकालीन विकार बळावण्याबरोबरच हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो. पीएम २.५ हे अतिसूक्ष्म धूलिकण फुफ्फुसांच्या आतील भागापर्यंत पोहोचून श्वसनमार्गाला सूज आणू शकतात, असे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. समीर गर्दे यांनी सांगितले. डोळ्यांवरील अश्रूंचा संरक्षणात्मक थर बाधित झाल्याने जळजळ, लालसरपणा, खाज आणि पाणी येण्याच्या तक्रारी वाढतात, असे आपत्कालीन वैद्यकीयतज्ज्ञ डॉ. संदीप गोरे यांनी नमूद केले. नेत्रविकारतज्ज्ञ डॉ. विकास नायर यांनीही प्रदूषणाच्या बाह्य आणि अंतर्गत परिणामांकडे दुर्लक्ष करू नये, असे स्पष्ट केले.
दरम्यान, मुंबईतील हिवतापाच्या रुग्णसंख्येतही वाढ नोंदवण्यात आली आहे. २०२२ मध्ये ३ हजार ९८५ रुग्ण आढळले होते, तर यंदा ऑक्टोबरपर्यंत ही संख्या १२ हजार ५७४ वर पोहोचली आहे. याशिवाय दिवाळीतील तेलकट आणि मसालेदार पदार्थांमुळे पोटदुखी, मळमळ आणि उलट्यांच्या तक्रारीही वाढल्या आहेत.










