पन्हाळा किल्ल्याची प्रतिकृती प्रथम

Contributed by: म. टा. वृत्तसेवा,बदलापूर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पन्हाळा किल्ल्याची प्रतिकृती प्रथम
रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटीच्या वतीने दिवाळीनिमित्त किल्ले निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात गणेश चौक, गणपती मंदिराशेजारील पन्हाळा किल्ल्याच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला. पंचरत्न कॉम्प्लेक्समधील शिवनेरी गडाच्या प्रतिकृतीला द्वितीय, तर शनिनगरमधील कुलाबा किल्ल्याच्या प्रतिकृतीला तृतीय क्रमांक मिळाला. गावदेवी मित्र मंडळ तसेच पंचरत्न सोसायटी येथील किल्ल्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

किल्ल्याची प्रतिकृती साकारताना मुलांनी पुस्तकांमधून तसेच इंटरनेटच्या माध्यमातून संबंधित किल्ल्यांचा इतिहास, त्यांची रचना, प्रवेशद्वारे, बुरुज आणि वैशिष्ट्यांचा अभ्यास केला होता. या स्पर्धेचे परीक्षण करताना केवळ किल्ल्याची सजावट किंवा आकर्षक मांडणी यालाच महत्त्व न देता, किल्ला तयार करण्यासाठी मुलांनी केलेला अभ्यास, निवडलेल्या ऐतिहासिक किल्ल्याची माहिती, प्रतिकृती साकारताना आलेल्या अडचणी आणि त्यावर त्यांनी केलेली मात या बाबींचाही विचार करण्यात आला.
स्पर्धकांनी राजगड, रायगड, मल्हारगड, पन्हाळा, तोरणा अशा विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. काही मुलांनी काल्पनिक किल्लेही तयार केले होते. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी झालेल्या प्रत्येक मुलाला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष ॲड. तुषार साटपे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत २० जण सहभागी झाले होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ललित साटपे, सोहम घायवट, जय पवार, जतिन साटपे, गौरव कांबळे आणि विजय तिळे यांनी सहकार्य केले.