परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढल्यामुळे बाजार वधारला

Contributed by: वृत्तसंस्था,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
foreign investment surge boosts indian stock market
परदेशी गुंतवणुकीचा सुरू असलेला ओघ आणि कच्च्या तेलाचा घसरलेला दर या पार्श्वभूमीवर वित्त, एफएमसीजी; तसेच तेल आणि वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्यामुळे सोमवारी दोन्ही शेअर बाजार वधारले. ‘ सेन्सेक्स ’ने ८२ हजारांचा टप्पा ओलांडला आणि ‘ निफ्टी ’ २५,३००च्या जवळ स्थिरावला.

‘सेन्सेक्स’ ५१२.३४ अंकांनी वधारून ८२,१०४.७९ अंकांवर बंद झाला. दिवसभरात तो ७१९.२० अंकांनी, म्हणजेच ०.८८ टक्क्यांनी वाढून ८२,३११.६५ अंकांवर पोहोचला. ‘निफ्टी’ १४६.८० अंकांनी वाढून २५,२९१.१० अंकांवर स्थिरावला. ‘सेन्सेक्स’मधील आयटीसी, भारती एअरटेल, इटर्नल, पॉवरग्रिड, एचडीएफसी बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट हे प्रमुख समभाग वधारले. त्याच वेळी टाटा स्टील, मारुती, इंटरग्लोब एव्हिएशन आणि बजाज फायनान्स यांसह काही समभाग घसरले.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी ५,७३६.५५ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. सलग दोन महिने निव्वळ विक्री केल्यानंतर त्यांनी ८४,२९० कोटी रुपये भारतीय बाजारात गुंतवले. जागतिक पातळीवरील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील विक्री, कच्च्या तेलाचा घसरलेला दर आणि मोठ्या कंपन्यांच्या समभागांचे आकर्षक मूल्यांकन यामुळे ही गुंतवणूक वाढली. बीएसई मिडकॅप सिलेक्ट निर्देशांक ०.९२ टक्क्यांनी, स्मॉलकॅप सिलेक्ट निर्देशांक ०.७१ टक्क्यांनी घसरला.