शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील समन्वय वाढविण्यासाठी चौथा ‘रिजनल रिसर्च सिम्पोजियम ऑन प्रोजेक्ट अँड प्रॉब्लेम-बेस्ड लर्निंग’ (आरआरएसपीबीएल २०२६) हा आंतरराष्ट्रीय परिसंवाद १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान ‘आयसर, पुणे’ येथे होणार आहे. सोलापूर येथील एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या वतीने हा परिसंवाद आयोजित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्ष प्रा. स्वाती कराड चाटे यांनी दिली.
एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत चाटे बोलत होत्या. या वेळी कुलसचिव डॉ. प्रभा कासलीवाल उपस्थित होत्या. ‘बिल्डिंग ब्रिजेस’ ही यंदाची मध्यवर्ती संकल्पना असून, प्रकल्पाधारित शिक्षण , विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता, कृत्रिम बुद्धिमत्तेचा शैक्षणिक वापर आणि उद्योगांच्या गरजांनुसार अभ्यासक्रमातील बदल यांवर चर्चा होणार आहे. संशोधन निबंध, पोस्टर सादरीकरण आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १९ नोव्हेंबरला शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षणाबाबत, तर २० नोव्हेंबरला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. समारोपाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू उपस्थित राहतील. निवडक शोधनिबंध स्कॉपस-सूचिबद्ध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध केले जातील. या परिसंवादात शंभरावर शिक्षक-प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत, असे प्रा. चाटे यांनी सांगितले.