वीजग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी

Contributed by: पुणे,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
golden opportunity for electricity consumers to clear arrears
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे थकबाकीच्या ओझ्याखाली असलेल्या पुणे परिमंडलातील दोन लाख ८२ हजार ९७७ वीजग्राहकांना ‘ महावितरण ’च्या ‘अभय योजना २०२६-२७’मधून थकबाकीमुक्त होण्याची आणि पुन्हा वीजजोडणी घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या ग्राहकांकडे सुमारे ४९८ कोटी रुपयांची थकबाकी असून, योजनेत सहभागी झाल्यास त्यावरील सुमारे ७८ कोटी रुपयांचे व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहेत. याशिवाय, मूळ थकबाकीच्या एकरकमी भरण्यावर २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.

‘महावितरण’ने सहा नोव्हेंबर ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत अभय योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ग्राहकांच्या थकबाकीवरील १०० टक्के विलंब आकार आणि व्याज; तसेच तात्पुरता वीजपुरवठा खंडित झाल्यापासून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित होईपर्यंतच्या कालावधीतील मागणी आकार आणि स्थिर आकार माफ करण्यात येणार आहेत. मूळ थकबाकीच्या कालावधीनुसार ग्राहकांना १० ते २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. या विशेष सवलतीचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण देय मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा १५ डिसेंबरपर्यंत करणे आवश्यक आहे.
एकरकमी भरणा करणे शक्य नसलेल्यांसाठी व्याजमुक्त हप्त्यांची सुविधा आहे. लघुदाब ग्राहकांना मूळ थकबाकीच्या किमान ५० टक्के रकमेचा भरणा करावा लागेल. उर्वरित रक्कम सहा समान व सलग मासिक हप्त्यांमध्ये भरता येईल.

विशेष म्हणजे, २० किलोवॉटपर्यंत जोडभार असलेल्या पात्र ग्राहकांनी पुनर्जोडणीच्या वेळी प्रीपेड स्मार्ट मीटर स्वीकारल्यास देय मूळ थकबाकीवर आणखी पाच टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे. ही सवलत पुनर्जोडणीनंतर ग्राहकाच्या प्रीपेड मीटर खात्यात जमा करण्यात येईल. योजनेअंतर्गत उच्चदाब व लघुदाब ग्राहकांचे पुनर्जोडणी शुल्क, तसेच लघुदाब ग्राहकांचे सेवा जोडणी शुल्क माफ करण्यात येणार आहे.