दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. दुष्काळाच्या काळात एकाही गरजू कुटुंबाला मदतीपासून वंचित ठेवणार नाही. संभाव्य पाणीटंचाई आणि चाराटंचाईचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज फुलंब्री येथे दिली.
फुलंब्री नगरपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शहर व तालुक्यातील गरजू कुटुंबे, विधवा महिला; तसेच दिव्यांग नागरिकांना दिवाळी शिधा संचांचे वाटप करण्यात आले. नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, उपनगराध्यक्ष जमीर पठाण, जिल्हा परीषद सदस्य राधाकिसन पठाडे, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, तहसीलदार योगिता खटावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी पालकमंत्री शिरसाट म्हणाले, ‘यंदा दुष्काळामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी आणि शेतमजुरांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध असला तरी आगामी फेब्रुवारी व मार्च महिन्यांत टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थितीचा विचार करून आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. नागरिकांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.’
चंद्रकांत जाधव यांनी प्रास्ताविक केले. नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे आणि रमेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले. अभिजित घोडके यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
या प्रसंगी माजी महापौर त्रिंबक तुपे, नंदकुमार घोडले, अश्फाक पटेल, अजगर पटेल, रमेश पवार, चंद्रकांत जाधव उपस्थित होते.