मेट्रो धावू लागली, प्रवाशांचा प्रतिसादही वाढू लागला. मात्र, स्थानकापर्यंत पोहोचायचे कसे, वाहन कुठे लावायचे आणि पुढचा प्रवास कोणत्या वाहतुकीने करायचा, या प्रश्नांची उत्तरे अद्याप शोधावी लागत आहेत. हीच अडचण दूर करण्यासाठी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला (िपंक लाइन) सार्वजनिक वाहतुकीच्या अन्य पर्यायांची जोड देण्याचा पुढाकार चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी घेतला आहे.
बहुमजली स्वयंचलित पार्किंग, दहा किलोमीटरच्या परिघात फीडर बस, एकात्मिक प्रवास नियोजन ॲप आणि एकत्रित तिकीट व्यवस्था अशा उपाययोजनांचा त्यांनी प्रस्ताव मांडला आहे. वाकड मेट्रो स्थानकाला प्रमुख वाहतूक केंद्र म्हणून विकसित करण्यावरही त्यांनी भर दिला आहे.आमदार शंकर जगताप यांनी सोमवारी (१६ नोव्हेंबर) वाकड चौक ते माण फेज तीन या मार्गावर मेट्रोतून प्रवास केला. या वेळी विविध विभागांचे अधिकारी, हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचारी; तसेच विविध गृहनिर्माण संस्थांमधील नागरिक, आयटीयन्स यांनी एकत्र मेट्रो प्रवास केला. प्रवासात नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयटीसीएमआरएल), पीएमपीएमएल, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या प्रतिनिधींशीही विविध सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
वाकड स्थानकाला पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर, सांगवी, निगडी, रावेत आणि आळंदी परिसरातील बससेवेशी जोडण्याची सूचना करण्यात आली. स्थानकांपासून निवासी व व्यावसायिक भागांपर्यंत सौरऊर्जायुक्त संरक्षित स्कायवॉक, पादचारी आणि दिव्यांगांसाठी सुरक्षित सुविधा उभारण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. या सूचनांचा संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.