इंटरनेट केबल चोरणारा अटकेत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
internet cable thief arrested in dhanakwadi
पुणे : धनकवडी परिसरात भारत संचार निगम लिमिटेडची ( बीएसएनएल ) भूमिगत इंटरनेट केबल चोरणाऱ्या तरुणाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

आजेश सुभाष शिंदे (वय २७, रा. शेखलाल बाजार, हिंगोली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
धनकवडीतील राजमुद्रा सोसायटीजवळ ‘बीएसएनएल’कडून भूमिगत इंटरनेट केबल टाकण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी रविवारी (१५ नोव्हेंबर) पहाटे साडेचारच्या सुमारास शिंदे आणि त्याच्या दोन साथीदारांनी ७६ हजार ८०० रुपयांची केबल चोरली. या वेळी परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना तिघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांनी केबल चोरल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ७६ हजार ८०० रुपयांची केबल हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी बीएसएनएल कर्मचारी प्रदीप जयसिंग चव्हाण (वय ४२) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.