जपानी सौंदर्याची भुरळ पाडणारा पुण्यातील हिरवागार आविष्कार

Contributed by: श्रद्धा सिदीडshraddha.sidid@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
जपानी सौंदर्याची भुरळ पाडणारा पुण्यातील हिरवागार आविष्कार
पुणे : उद्यान म्हटले, की आपल्या डोळ्यांसमोर ठरावीक रचना येते. मात्र, नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) पुणे-ओकायामा मैत्री उद्यानाला भेट दिल्यावर वेगळ्या प्रकारच्या उद्यानांची आपल्याला ओळख होते. जपानी उद्यानशैलीचा अनुभव देणारे हे उद्यान पुणे आणि जपानमधील ओकायामा शहराच्या मैत्रीचे प्रतीक आहे. हे उद्यान प्रसिद्ध साहित्यिक

पु. ल. देशपांडे यांच्या नावाने ओळखले जाते. जपानी उद्यानशैलीतील हे भारतातील एकमेव उद्यान आहे.
पुणे महापालिका, असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपान आणि गव्हर्न्मेंट ऑफ ओकायामा प्रेफेक्टर यांच्या सहकार्याने सन २००६मध्ये हे उद्यान विकसित करण्यात आले. सुमारे ४० हजार चौरस मीटर म्हणजेच दहा एकर परिसरात हे उद्यान विस्तारले आहे. जपानच्या ओकायामा शहरातील सुमारे ३०० वर्षे जुने कोराकुएन उद्यान हे या उद्यानाच्या निर्मितीमागील प्रेरणा आहे. हे गार्डन इकेदा राजघराण्याने ओकायामामध्ये १२ हेक्टरमध्ये विकसित केले होते. पुणे आणि ओकायामा यांच्यातील संस्कृती, परंपरा, उद्योग, आणि मैत्रीच्या संबंधांचा सेतू म्हणून हे उद्यान ओळखले जाते.

पु. ल. देशपांडे उद्यानात प्रवेश केल्यानंतर जपानी स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये अनुभवायला मिळतात. झेन तत्त्वज्ञानावर आधारित रचना करण्यात आली आहे. सगळीकडे हिरवळ, नागमोडी वळणाच्या पायवाटा, लहान टेकड्या, बांबूची बेटे, लाकडी पूल, सागवानी लाकडाचे सहा पॅगोडा आणि खळखळते पाण्याचे प्रवाह यांची सुरेख आखणी करण्यात आली आहे. उद्यानातील तळे, कारंजे, विलोभनीय धबधबे आणि विविधरंगी मासे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. जपानी पद्धतीने सुबक छाटणी केलेली झाडे, विविध शोभिवंत वृक्ष, झाडे, बांबू; तसेच हंगामी फुलझाडे येथे पाहायला मिळतात. या परिसरात पक्ष्यांचाही वावर मोठ्या प्रमाणात आहे. विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळल्याची नोंद आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षकांसाठीही हे उद्यान खास ठरते. काही प्रसिद्ध सिनेमांचे चित्रीकरणही येथे झाले आहे.

या उद्यानाची रचना अशा प्रकारे केली आहे, की संपूर्ण वर्षभर पर्यटकांना आनंददायी अनुभव मिळतो. पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात फिरता येते. खळखळ वाहणाऱ्या झऱ्यांचा मधुर आवाज, निसर्गाच्या सान्निध्यातील शांतता आणि सौंदर्य यामुळे मनःशांती मिळते. सकाळी सहा ते ११ आणि सायंकाळी चार ते नऊ या वेळेत उद्यान खुले असते.

उद्यानात प्रवेश मात्र सशुल्क आहे. दैनंदिन दिनचर्येचा भाग म्हणून येणारे नागरिक मासिक पास काढूनही येतात. येथे दररोज सकाळी ग्रुपने येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्याही मोठी आहे. येथील वातावरणात सकारात्मक ऊर्जा असून, येथे भेट दिल्यावर दिवस अतिशय उत्साहात जात असल्याचा अनुभव ते सांगतात. सकाळी फिरायला येणाऱ्या फिटनेसप्रेमी नागरिकांसाठी तर हे उद्यान म्हणजे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. कोणत्याही अडथळ्याविना सलग मॉर्निंग वॉक इथे घेता येतो; तसेच चालताना आवश्यक असलेला चढ-उतारही येथे आहे. व्यायाम करताना विश्रांतीसाठी बसण्याचीही व्यवस्था आहे. या उद्यानाच्या शेजारी मुघल गार्डनही विकसित करण्यात आले आहे.

जपानी सौंदर्याची भुरळ पाडणारा पुण्यातील हिरवागार आविष्कार