‘एमएमसीओई’ला दुहेरी पुरस्कार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
mmcoe receives two significant awards
पुणे : तांत्रिक शिक्षणातील गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापनातील योगदानाची दखल घेऊन मराठवाडा मित्रमंडळाच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगने ( एमएमसीओई ) प्रतिष्ठेच्या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या (आयएसटीई) महाराष्ट्र-गोवा विभागीय पुरस्कार २०२६ मध्ये दुहेरी यश संपादन केले आहे. महाविद्यालयाला ‘बेस्ट इंजिनीअरिंग कॉलेज (डिग्री)’ पुरस्काराने गौरविण्यात आले, तर महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख आणि आयएसटीई समन्वयक, डॉ. संकीर्ती शिरवले यांना ‘बेस्ट विमन टीचिंग फॅकल्टी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तांत्रिक शिक्षणातील उत्कृष्ट कामगिरी, शैक्षणिक गुणवत्ता आणि संस्थात्मक विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन महाविद्यालयाला हा पुरस्कार देण्यात आला. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. सचिन साखरे, डॉ. संकीर्ती शिरवले, आयएसटीई फॅकल्टी ॲडव्हायझर माधवी इंदलकर आणि डॉ. विलास बुगडे यांनी या कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारला.
अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, शैक्षणिक उपक्रमांमधील सहभाग आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल डॉ. शिरवले यांना वैयक्तिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

या दुहेरी यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले.