मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी एक हजार २४० कोटी रुपयांचा निधी असूनही राज्यातील मच्छीमारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. या योजनेसाठी केवळ ४३२ अर्ज आले असून, विशेषतः किनारपट्टीवरील जिल्ह्यांत अर्जांची संख्या कमी आहे.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अपेक्षेपेक्षा कमी अर्ज आल्याने योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा, असा आदेश मत्स्यव्यवसाय व बंदरेमंत्री नीतेश राणे यांनी सोमवारी दिला.या योजनेचा लाभ अधिकाधिक मच्छीमारांपर्यंत पोहोचविण्यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सांगलीसह किनारपट्टीवरील जिल्ह्यांत अर्जांची संख्या अपेक्षेप्रमाणे नसल्याचे राणे यांनी आढावा बैठकीत सांगितले.