कर्नाटक सरकारने येथील कुमारा कृपा अतिथीगृहाच्या जुन्या इमारतीचे नामकरण ‘ गंगा ’ असे करून तिला मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे सरकारी निवासस्थान घोषित केले आहे, तर विरोधी पक्षाने ‘सुमारे दहा टक्के बदल’ झालेल्या १६० वर्षांहून जुन्या वारसा इमारतीमध्ये केलेल्या ‘फेरफारां’वर आक्षेप घेतला आहे.मुख्यमंत्री शिवकुमार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी नव्या सरकारी निवासस्थानात विशेष पूजा केली. सोमवारी जारी करण्यात आलेल्या एका शासकीय आदेशानुसार, जुन्या अतिथीगृह इमारतीच्या नूतनीकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांना भेटायला येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करणे, जनतेच्या तक्रारी ऐकणे, तक्रारी व संबंधित तपशील सॉफ्टवेअर प्रणालीत नोंदवणे आणि पाहुण्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांचे व्यवस्थापन करणे यासाठी या वास्तूचा वापर केला जाईल, असे सरकारने म्हटले. या इमारतीमुळे बैठका व सरकारी कार्यक्रमांचे आयोजनही सुलभ होईल, असे आदेशात नमूद करण्यात आले.
शिवकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना, काही बदलांसह ते आपल्या खासगी निवासस्थानातून येथे राहायला जात आहेत, असे सांगितले. ‘गुरुवारी मी सर्व २२४ आमदार, खासदार आणि विधान परिषद सदस्यांना निमंत्रित करीन. त्यानंतर मी या निवासस्थानात लोकांना भेटायला अधिकृतपणे सुरुवात करीन,’ असेही त्यांनी सांगितले.
‘खर्चावरून टीकेची जाणीव’
‘खर्चावरून मला टीकेला सामोरे जावे लागू शकते याची जाणीव होती. मी स्वतःच्या घरातून फर्निचर आणले आहे; तसेच जुन्या कुमारा कृपा निवासस्थानातील फर्निचरही वापरले आहे,’ असे शिवकुमार म्हणाले.