‘टीव्हीएस’ कुटुंबातील मालमत्ता वाद चिघळला

Contributed by: वृत्तसंस्था,चेन्नई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘टीव्हीएस’ कुटुंबातील मालमत्ता वाद चिघळला
‘टीव्हीएस समूहा’तील मालमत्तेच्या वाटणीवरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाला आता कायदेशीर वळण मिळाले आहे. समूहातील ज्येष्ठ उद्योजक वेणू श्रीनिवासन यांच्या कन्या लक्ष्मी वेणू यांनी वडिलांच्या कुटुंब शाखेशी संबंधित संयुक्त कौटुंबिक मालमत्तेचे कायदेशीर विभाजन करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात त्यांनी वडिलांना नोटीस पाठवली असून, कुटुंबप्रमुख म्हणून न्याय्य आणि कायदेशीर वाटणीची जबाबदारी पार पाडावी, असे त्यात म्हटले आहे.
सन २००५मध्ये दुरुस्ती झालेल्या ‘ हिंदू वारसा कायदा , १९५६’च्या ‘कलम सहा’नुसार संयुक्त आणि वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींनाही मुलांप्रमाणे समान हक्क आहेत. त्यामुळे मालमत्तेच्या विभाजनाची मागणी करण्यासाठी इतर कुटुंबीयांच्या संमतीची आवश्यकता नाही, असा दावा लक्ष्मी यांनी केला आहे.

सन २०२०च्या ‘टीव्हीएस कौटुंबिक करारा’नुसार, वेणू श्रीनिवासन यांना देण्यात आलेल्या ‘टीव्हीएस होल्डिंग्ज’, ‘टीव्हीएस मोटर कंपनी’, ‘टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस’, ‘सुंदरम-क्लेटन’च्या हिश्श्यांवरही दावा करण्यात आला आहे.

वेणू श्रीनिवासन यांच्या कुटुंबाकडे देशातील तिसरी सर्वांत मोठी दुचाकी उत्पादक कंपनी असलेल्या आणि २० अब्ज डॉलरहून अधिक मूल्याच्या टीव्हीएस मोटर कंपनीचे नियंत्रण आहे. सध्या या शाखेची धुरा लक्ष्मी वेणू यांचे धाकटे बंधू सुदर्शन वेणू यांच्याकडे आहे.

लक्ष्मी यांच्या म्हणण्यानुसार, ‘टीव्हीएस’ कुटुंबात सन २०२०मध्ये झालेला करार हा त्यांच्या वडिलांच्या कुटुंबातील अंतिम विभाजन मानता येणार नाही. त्यांच्या कुटुंबात स्वतंत्र वाटणीसाठी कोणताही समझोता किंवा प्रक्रिया सुरू अथवा पूर्ण झालेली नाही, असा त्यांचा दावा आहे. कौटुंबिक व्यवसायाचे व्यवस्थापन एखाद्या सदस्याकडे असणे म्हणजे त्याला मालमत्तेवर विशेष मालकी मिळत नाही; तसेच, व्यवस्थापनाची जबाबदारी दिल्याने इतरांचे कायदेशीर हक्क संपत नाहीत. कौटुंबिक मालमत्तेतील लाभदायी हितसंबंध भाऊ सुदर्शन यांच्या बाजूने केंद्रित करून आपल्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप लक्ष्मी यांनी केला आहे. हा कायदेशीर वादाबरोबरच विश्वासभंगाचाही मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकतर्फी निर्णय किंवा कॉर्पोरेट व्यवस्थांद्वारे मुलींचे अधिकार डावलता येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, न्यायालयीन संघर्षाऐवजी पारदर्शक, न्याय्य आणि सौहार्दपूर्ण तोडगा काढण्यास प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

लक्ष्मी यांच्या आई मल्लिका श्रीनिवासन यांनी मुलीच्या दाव्याला पाठिंबा दिला आहे. यापूर्वीचे समझोत्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे सांगून त्यांनी मुलगा आणि मुलगी समान असल्यावर भर दिला. ‘कौटुंबिक मालमत्तेत सुदर्शनइतकाच लक्ष्मी यांचा योग्य वाटा आहे,’ असे मल्लिका यांनी म्हटले आहे. सर्व संबंधितांच्या हितासाठी समता, स्पष्टता, परस्पर समजूत आणि पारदर्शक संवादातून हा वाद सोडवावा, असे आवाहन करून त्यांनी संयम, सन्मान आणि प्रतिष्ठेने पुढे जाण्याची अपेक्षा व्यक्त केली.