रांगोळीच्या रंगात रमले ठाणेकर

Contributed by: म. टा. वृत्तसेवा,ठाणे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
रांगोळीच्या रंगात रमले ठाणेकर
दिवाळीचा सण, रंगांची उधळण आणि कलाकारांच्या हातातील कलेचा अप्रतिम आविष्कार अशा वातावरणात वर्तकनगरमधील रांगोळी प्रदर्शन ठाणेकरांच्या आकर्षणाचे केंद्र बनले होते. कलाकार रांगोळीकार मंडळ, ठाणे यांच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तब्बल ३३ वर्षांची परंपरा लाभलेल्या या प्रदर्शनात कलाकारांनी साकारलेल्या बोलक्या आणि जिवंत रांगोळ्या पाहण्यासाठी रसिकांची मोठी गर्दी झाली होती.

वर्तकनगर येथील ब्राह्मण विद्यालयात सुलेखनकार पिनाकिन रिसबूड आणि ज्येष्ठ पत्रकार सुशील सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस आणि ओवळा-माजिवडा विधानसभा विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
या प्रदर्शनातील काही रांगोळ्या पाहताना त्या प्रत्यक्ष व्यक्तींची छायाचित्रे असल्याचा भास होतो. योगेश भागणे यांनी साकारलेली अभिनेते नाना पाटेकर यांची रांगोळी विशेष लक्षवेधी ठरत आहे. नाना पाटेकर यांचा चेहरा, डोळ्यांतील भाव आणि व्यक्तिमत्त्व हुबेहूब उतरविण्याचा प्रयत्न या कलाकृतीतून केला आहे. भरत तेरे यांनी साकारलेली प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची रांगोळीही चर्चेचा विषय ठरली आहे.

याशिवाय हिंदवी तेरे हिची गणपतीची रांगोळी, मनोज सावंत यांच्या ‘स्वामी समर्थ’ आणि ‘देऊळ बंद २’, रमाकांत कांबळे यांची ‘प्राणी संवर्धन’ आणि सुधाकर भोसले यांची ‘वृक्षतोड’ या रांगोळ्यांनीही लक्ष वेधून घेतले. बबन राणे यांनी क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह याची, तर मयंक थोरात यांनी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रतिमा साकारली. अनिरुद्ध जाधव, उमेश सुतार आणि अमित सावंत यांनी दुष्काळ या विषयावर रांगोळीतून भाष्य केले.