पुणे : तांदळाच्या व्यापाऱ्यांसह तांदूळ मिलर्स आणि घाऊक विक्रेत्यांना साठ्याची माहिती केंद्र सरकारच्या पोर्टलवर नोंदवावी लागणार आहे. यासाठी सरकारने सात दिवसांची मुदत दिली असून, त्यानंतर दर शुक्रवारी साठ्याची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक आहे.
केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने हा आदेश दिला आहे. त्यानुसार व्यापारी, घाऊक व किरकोळ विक्रेते, तांदूळ प्रक्रिया उद्योग आणि अन्य साठाधारकांना ‘ फूड स्टॉक पोर्टल ’वर नोंदणी करावी लागेल. तांदळाच्या साठ्याची नोंद करताना बासमती, प्रीमियम नॉन-बासमती, सामान्य नॉन-बासमती, अर्ध-उकडलेला तांदूळ, तुटलेला तांदूळ आणि धान अशा सहा प्रकारांत स्वतंत्र माहिती द्यावी लागणार आहे.‘या नोंदींमुळे देशातील तांदळाच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवणे आणि बाजारपेठेतील पुरवठ्याचे नियोजन करणे सरकारला शक्य होणार आहे,’ अशी माहिती तांदळाचे व्यापारी डॉ. राजेश शहा यांनी केले.