सौरऊर्जा फ्रँचायझीच्या आमिषाने २८ लाखांची फसवणूक

Contributed by: मुंबई,म. टा. विशेष प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
solar energy franchise defrauds traders of 28 million
सौरऊर्जा कंपनीची राज्यस्तरीय फ्रँचायझी देण्याचे आणि त्यातून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकांची सुमारे २८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंधुदुर्ग येथील व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून मालाडमधील ‘मॅक्स एनर्जी सर्व्हिसेस’ आणि ‘मॅक्स ग्रीन प्लॅनेट सोलार प्रा. लि.’ या कंपन्यांच्या दोन संचालकांसह नऊ जणांविरोधात बांगुरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किराणा दुकानदार रवींद्र साठेलकर हे फेसबुकवरील रिल्स पाहत असताना त्यांना ‘मॅक्स एनर्जी सर्व्हिसेस’ची सौरऊर्जा फ्रँचायझी देण्याची जाहिरात दिसली. जाहिरातीतील क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर आवेश अबुद सय्यद याने त्यांना संपूर्ण महाराष्ट्राची फ्रँचायझी देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी एक लाख ७७ हजार रुपये शुल्क असल्याचे सांगितले. त्यानंतर साठेलकर मुलासह मालाडमधील चिंचोळी बंदर परिसरातील एव्हरशाईन मॉलमध्ये असलेल्या कंपनीच्या कार्यालयात गेले. तेथे सय्यद आणि प्रिया नावाच्या प्रतिनिधीने शासकीय योजनांचा लाभ मिळण्याबरोबरच विक्रीवर १२ टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवले.
या आश्वासनांवर विश्वास ठेवून साठेलकर यांनी पेटीएमद्वारे कंपनीच्या आरबीएल बँक खात्यात तीन टप्प्यांत एक लाख ७७ हजार रुपये जमा केले. पैसे मिळाल्यानंतर आठ दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, मुदत उलटूनही कोणतीही ऑर्डर मिळाली नाही. साठेलकर यांनी विचारणा केली असता सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर संबंधितांचे फोन बंद येऊ लागले.

संशय आल्याने साठेलकर यांच्या पत्नी नेहा, मुलगा करण आणि मुलगी अश्लेषा यांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यावेळी पोलिसांनी हे कार्यालय सील केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. साठेलकर यांच्याप्रमाणेच अन्य आठ जणांचीही फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे. महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, रायगड आणि छत्रपती संभाजीनगरसह मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील व्यावसायिकांकडूनही पैसे उकळण्यात आल्याचे समोर आले आहे. या आठ जणांकडून मिळून सुमारे २८ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी कंपनीचे संचालक देवेंद्र अरविंद विरकर आणि मोहन शहा यांच्यासह कमलेश, राज विश्वकर्मा, गौतम सिंग, उद्धव शेजवाल, आदित्य, आवेश अबुद सय्यद आणि प्रिया अशा नऊ जणांविरोधात पोलिसांनी आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.