ऊसदराचा प्रश्न चिघळला

Contributed by: सोलापूर,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
ऊसदराचा प्रश्न चिघळला
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळावा, या मागणीसाठी सोलापुरात शेतकऱ्यांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. ऊसदराच्या प्रश्नावरून साखर कारखानदार आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष तीव्र झाला असून, संतप्त शेतकऱ्यांनी सात रस्ता येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. हातात ऊस घेऊन आलेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता शेतकरी आणि पोलिस आमनेसामने आले.

स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेऊन चर्चा केली. या वेळी माजी आमदार महादेव जानकर, कामगार नेते नरसय्या आडम, तानाजी बागल, दीपक भोसले, सचिन पाटील, समाधान फाटे, विजय रणदिवे, सचिन आटकळे, माऊली जवळेकर, नरसय्या आडम यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारखानदारांना इशारा

खासदार राजू शेट्टी यांनी यापूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. उसाला पहिली उचल प्रतिटन ३,८०० रुपये द्यावी, तसेच गळीत हंगाम संपल्यानंतर आणि साखरेच्या दरवाढीच्या अनुषंगाने अतिरिक्त रक्कम द्यावी, अशी त्यांची मागणी आहे; अन्यथा एक लाख शेतकऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आणण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळत नसेल, तर शेतकऱ्यांनी अन्याय सहन का करायचा? कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. योग्य दर जाहीर केल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, अशी त्यांची आक्रमक भूमिका आहे.

या आंदोलनामुळे सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ऊस उत्पादनासाठी वाढलेला खर्च, मजुरी, खते, औषधे आणि वाहतूक खर्च यामुळे शेतकरी अडचणीत आहेत, तर दुसऱ्या बाजूला कारखानदारांनी जाहीर केलेला दर शेतकऱ्यांना मान्य नाही. त्यामुळे प्रशासनाने मध्यस्थी करून कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये तातडीने चर्चा घडवून आणावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेतकरी नेते अनिल पवार यांनीही कोल्हापूरच्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊसदराचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. शेतकऱ्यांचा प्रश्न हा कोणत्याही एका संघटनेचा नसून, संपूर्ण ऊस उत्पादकांचा आहे. त्यामुळे पक्ष, संघटना आणि गटतट बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीसाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.